कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...

Maharashtra News : महाराष्ट्रातूनच नव्हे तर, देशातून कोरोनानं बहुतांशी काढता पाय घेतला आहे. पण, आता मात्र राज्यात एका नव्या संसर्गानं चिंता वाढवली आहे.   

सायली पाटील | Updated: Jun 25, 2024, 08:41 AM IST
कोरोना नव्हे, महाराष्ट्रात सुगावाही लागू न देता फोफावतोय 'हा' संसर्ग; रुग्णसंख्या 400 पार...  title=
Swine Flu cases increases In Maharashtra 432 patients Reported In 5 Month incliding 15 Deaths

Maharashtra News : महाराष्ट्रासह देशभरात गेल्या काही काळापासून हवामानात सातत्यानं काही बदल होताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे हवामानातील या बदलांचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहेत. त्यातच सध्या महाराष्ट्रात कोणालाही सुगावा लागू न देता एक संसर्ग हातपाय पसरत असून, सध्याच्या घडील रुग्णसंख्या मोठी नसली तरीही या संसर्गाता एकंदर वेग पाहता काळजी न घेतल्यास आव्हनात्मक परिस्थिती उदभवण्याची चिन्हं आहेत. 

मुंबईसह राज्याच्या इतर भागांमध्ये सध्या स्वाईन फ्लूचा संसर्ग पसरत असल्याचं वृत्त आहे. राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या वर्षी 15 जूनपर्यंत राज्यात 432 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले, ज्यापैकी 15 रुग्णांनी या संसर्गामुळं जीव गमावला. 

(Mumbai Monsoon Updates) मान्सूनच्या सुरुवातीपासूनच मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोसारख्या साथीच्या आजारांचे रुग्णही वाढले. पण, स्वाईन फ्लूची रुग्णसंख्या आता चिंतेत भर टाकताना दिसत आहे. सध्या मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्येसुद्धा स्वाईन फ्लूचे रुग्ण असून, सध्याच्या घडीला मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये असणारं उष्ण- दमट वातावरण या विषाणूच्या संसर्गासाठी पूरक असल्यामुळं ही परिस्थिती ओढावली आहे. 

हेसुद्धा वाचा : 1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?

 

सर्दी खोकला, ताप, अंगदुखी, घशात खवखव ही आणि अशी सर्वसाधारण लक्षणं दिसल्यास नागरिकांना वैद्यकिय सल्ला घेण्यास सांगितलं जात आहे. दरम्यान, सध्या आढळणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये किमान वेळातच प्रकृती सुधारणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा असल्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य यंत्रणा करत आहेत. 

स्वाईन फ्लूची लक्षणं आणि महत्त्वाची माहिती 

स्वाईन फ्लू हा संसर्ग H1N1 च्या नावानंही ओळखला जातो. एखाद्या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून किंवा थुंकण्यातून या विषाणूंचा संसर्ग फैलावतो. अस्वच्छ पृष्ठाला स्पर्श केल्यानंतर तेच हात नाक किंवा डोळ्यांपर्यंत पोहोचल्याससुद्धा हा संसर्ग फैलावतो. 

काय आहेत स्वाईन फ्लू ची लक्षणं? 

श्वसनास त्रास, थकवा, सर्दी, खोकला, शिंका येणं, घशात खवखव, मांसपेशींमध्ये वेदना, ताप. 

सदर संसर्गामध्ये लहान मुलं, गरोदर महिला, वयोवृद्ध मंडळी, हृदय आणि फुफ्फुसाचे विकार असणारे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण या आणि इतर व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांनी या संसर्गाच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.