'ठाकरे' घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढविणार

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.  

सुरेंद्र गांगण | Updated: Sep 30, 2019, 06:33 PM IST
'ठाकरे' घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढविणार title=

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात मुंबईतील वरळीतून उमेदवारीची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणूक लढवत आहे.  गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी स्वत: जाहीर करत ही चर्चा खरी असल्याचे स्पष्ट केले.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मात्र, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. केवळ आपल्या हातात रिमोट कंट्रोल ठेवला होता. त्यांच्या शब्द हा अंतिम होता. पुढे त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. मात्र, त्यांनी प्रमुख पदाऐवजी शिवसेना पक्ष प्रमुख हे पद निर्माण केले. बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत. तेच शिवसेना प्रमुख आहेत. त्यांची जागा कोणीही घेवू शकत नाही, असे स्पष्ट केले. आता ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी थेट राजकारणात निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी स्वत:च निवडणूक लढण्याची घोषणा केली. वरळीतील शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी स्वत:च घोषणा केली आहे. दरम्यान, नावाची घोषणा होण्याआधीच आदित्य ठाकरेंकडून जोरदार प्रचार सुरू झाला होता. सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी हा व्हिडिओ शेअर केला. 

घोषणा केल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणालेत, आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे. मात्र त्याचसोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे.  मी संपूर्ण महाराष्ट्रात गावागावत गेलो. तेथील जनतेचा आवाज ऐकला. त्यानंतर मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे.  माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू द्या, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणालेत, हा निर्णय माझ्या स्वप्नासाठी नाही, तर जनतेसाठी घेतला आहे. आमदार. मुख्यमंत्री व्हायचा आहे, म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. जनतेचे स्वप्न साकार कऱण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. फक्त निवडणूक नाही तर लोकांच्या न्याय-हक्कांचा लढा लढण्याची हीच वेळ आहे. बेरोजगारी संपवण्याची ही वेळ आहे. एक नवा महाराष्ट्र निर्माण करयचा आहे, असे ते म्हणालेत.