शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Updated: Dec 12, 2019, 09:45 PM IST
शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केलं. पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या आणि पुत्र असं कुटुंबही यावेळी उपस्थित होते.

या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. तब्बल तासभर ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. सरकारच्या खातेवाटपाबाबत तसंच मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराबाबत ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचं समजतं.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे. गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलं होतं. अखेर गृह आणि नगरविकास खातं हे शिवसेनेला मिळालं आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.

हे खातेवाटप तात्पुरतं आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा एकदा खातेवाटप होईल. १५ दिवसानंतर हे खातेवापट होईल, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे- गृहमंत्री, नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, संसदीय कामकाज, माजी सैनिक कल्याण

छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शूल्क, कौशल्य विकास आणि उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन

बाळासाहेब थोरात- महसूल, उर्जा व अपारंपारिक उर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशू संवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय

सुभाष देसाई- उद्योग आणि खणीकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा

जयंत पाटील- वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास

नितीन राऊत- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बालविकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण