मुंबई महापालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दणका

....म्हणून उलचण्यात आली ही कठोर पावलं 

Updated: Mar 3, 2019, 08:19 AM IST
मुंबई महापालिका रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दणका  title=

मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेशी संलग्न असणाऱ्या महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना औषध पुरवठा करणाऱ्या पाच कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. संबंधित रुग्णालयांना या कंपन्यांकडून वेळच्या वेळी औषध पुरवठा करण्याच येत नसल्यामुळे प्रशासनातर्फेच ही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. 

औषध पुरवठा करणाऱ्या या कंपन्यांमधीलच एक असणाऱ्या 'डॅफ्फोडिल्स' या कंपनीवर तात्काळ कारवाईही करण्यात आली आहे. तर, उर्वरित चार कंपन्यांवरही तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचं कळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून पालिका रुग्णालयांमध्ये औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्यामुळे आणि परिणामी रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे आयुक्तांनी चौकशी समितीची नियुक्ती केली होती. या चौकशी समितीकडून देण्यात आलेल्या अहवालानंतर पाच कंपन्यांचा नावांचा काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आलं. 

पाच कंपन्यांना पालिकेकडून दणका देण्यात आल्यासोबतच इथून पुढे दरवर्षी आढावा बैठक घेऊन औषध पुरवठा वेळेवर न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. औषधांचा तुटवडा टाळण्यासाठी औषध खरेदीची सुयोग्य कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देशही यावेळी प्रशासनाकडून देणयात आले..