मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईचा लोअर परळ पूल तोडून २ वर्ष होत आली. तरीही या पुलाचं बांधकाम झालेलं नाही. रोजची वाहतूक कोंडी आणि प्रवाशांची गर्दी यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईच्या अगदी मधोमध असलेला महत्वाचा लोअर परळचा पूल २४ जुलै २०१८ ला बंद करण्यात आला. हा पूल पाडल्यानंतर सध्य़ाची स्थिती पाहिली तर पूल बांधून होणार कधी असा प्रश्न प्रत्येक मुंबईकराला पडला आहे. पूल पाडल्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी या भागात मुंबईकरांची तुफान गर्दी होते. शिवाय दिवसभर या भागात वाहतूक कोंडी कायम असते.
रेल्वेचं काम कासवगतीने सुरू आहे. तर जोडपुलाचं काम अजून सुरुच झालेलं नाही. तरीही रेल्वे आणि बीएमसी जून २०२१ला पूल पूर्ण होईल असा वायदा करते. मुंबईकरांचा यावर विश्वास नाही.
रोजची रेल्वे प्रवाशांची गर्दी पाहता चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना होण्याची शक्यता जास्त आहे. पूल पूर्ण होण्यासाठी रेल्वे आणि बीएमसी या भागात चेंगराचेंगरी होण्याची वाट बघतेय का असा सवाल उपस्थित केला जातोय.
दरम्यान, वरळी-वांद्रे सी-लिंक प्रकल्पाचं वर्सोवापर्यंत विस्ताराचं काम अद्याप सुरू असताना, हाच सेतू आता थेट विरारपर्यत नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. नरिमन पॉईंट ते विरार प्रवास साडेतीन तासांचा आहे. पण विस्तारानंतर फक्त सव्वा ते दीड तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव आता राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.