BREAKING - मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लोकल' निर्णयाला महत्व नाहीच, व्यापाऱ्यांनाही दिलासा नाही

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली, पाहा या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले 

Updated: Jul 14, 2021, 06:26 PM IST
BREAKING - मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'लोकल' निर्णयाला महत्व नाहीच, व्यापाऱ्यांनाही दिलासा नाही title=

मुंबई : राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय 2 वर्षांनी वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून डॉक्टरांच्या निवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या या महत्त्वाच्या निर्णयाला मान्यात देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 8 दिवसात डॉक्टरच्या 899 जागा भरण्यात आल्या असून पुढच्या काही दिवसात 1 हजार नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्यातील कोविड स्थितीचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला, राज्यातील 92 टक्के रुग्ण 10 जिल्ह्यात असून उरलेल्या 26 जिल्ह्यात 8 टक्के रुग्ण असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. गेल्या एक महिन्यात 7 ते 8 हजारच्या घरात रुग्ण दररोज वाढतायत, पण देशाच्या तुलनेत वाढीचा वेग देशाच्या कमी आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी लोकल सुरु करण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, त्याबाबत आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नसल्याचं आता स्पष्ट झालंय. दुसरीकडे राज्यभरात व्यापारी वर्ग कोरोना निर्बंधांविरोधात आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांबाबत काही सकारात्मक निर्णय होऊ शकतो, अशीही एक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, निर्बंधांमध्ये कोणतीही सूट देण्याचा निर्णय आज झालेला नाही, मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

खाजगी रुग्णालयांना उत्पादकांकडून 25 टक्के लस घेता येऊ शकते, तो वाटा राज्याला कसा जास्तीत जास्त मिळेल यादृष्टीने प्रयत्न सुरु आहे. सध्या राज्याला लसीचा पुरवठा कमी आहे, ऑगस्ट महिन्यात 4 कोटी लसी उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.  आपण 10 ते 15 लाख लसीकरण दररोज करु शकतो, मात्र आपल्याला दिवसाला केवळ 6 ते 7 लाख लसीच मिळतात अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

शाळा सुरु होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो, तो तयार नाही, त्यामुळे शाळा लगेच सुरु होतील अशी सध्या शक्यता दिसत नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.