थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताय? ही काळजी नक्की घ्या...

बंद करण्यात आलेली रेस्टॉरंट दिमाखात सुरू झाली आहेत...

Updated: Dec 25, 2018, 03:55 PM IST
थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताय? ही काळजी नक्की घ्या...

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : सगळीकडे सध्या थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांची तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी याच काळात दुर्दैवानं कमला मिल दुर्घटना घडली होती. तरी या आग दुर्घटनेतून ना महापालिकेनं धडा घेतला... ना मुंबईकरांनी... अजूनही हॉटेल, रेस्टॉरंट, पब्जमधील अग्निसुरक्षा रामभरोसेच असल्याचं दिसून येतंय.

२९ डिसेंबर २०१७ च्या रात्री लोअर परळमधल्या कमला मिलमधल्या 'मोजो बिस्ट्रो' आणि 'वन अबव्ह' या पब्जला लागलेल्या आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला आता एक वर्ष पूर्ण होतंय. या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनं संपूर्ण मुंबईभर मोहीम राबवत हॉटेल, रेस्टॉरंट, पब्जमधल्या अग्निसुरक्षेची तपासणी केली होती. तसंच नियम न पाळणाऱ्यांना नोटीसाही दिल्या होत्या. काही रेस्टॉरंट तर बंदही करण्यात आली होती. 

पण, हे फक्त काही दिवसच चाललं... काही दिवसांनी पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या...' प्रमाणे नोटीस दिलेली आणि बंद करण्यात आलेली रेस्टॉरंट दिमाखात सुरू झाली. या सर्वांनीच अग्निसुरक्षेची पुर्तता केली असेल असं म्हणणं खूपच धाडसाचं ठरेल. कारण यानंतर मुंबईत अनेक हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये आगीच्या घटना समोर आल्या आहेत. बांद्रा रिक्लेमेशनच्या ओएनजीसी कॉलनीमध्ये एका ओळीनं असलेल्या वीसभर रेस्टॉरंटसचीही तेव्हा पाहणी करून अनेकांचे परवाना रद्द केले होते. परंतु काही दिवसांतच इथली सगळी रेस्टॉरंटस सुरु झाली. हे केवळ या एका ठिकाणी घडलंय असं नाही. असं सर्वत्र मुंबईभर घडलंय. तसंच केवळ हॉटेल, रेस्टॉरंटच्या बाबतीतच नव्हे तर निवासी, रुग्णालये आणि सर्व आस्थापनांच्या बाबतीतही अग्नी सुरक्षेबाबत बोंबच असल्याचं समोर आलंय.  

अग्निसुरक्षा ही केवळ अग्निशमन दलाची जबाबदारी नाही, तर संबंधित आस्थापना आणि निवासी इमारतींचीही आहे. इथल्या अग्निरोधक यंत्रणांची वारंवार तपासणी करून संबंधितांकडून त्याची पूर्तता करून घेण्याची जबाबदारी अग्निशमन दलाची आहे. परंतु ती इथं होताना दिसत नाही. कमला मिल आग दुर्घटनेनंतर अग्निशमन दलानं तर अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी खास सेल उभा करून त्यासाठी ३४ अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली. परंतु यामुळं आगी रोखणं दूरच राहिलं, यातून भ्रष्टाचाराचे एक नवे कुरणचं निर्माण झाल्याचा आरोप होतोय. तसंच वारंवार लागत असलेल्या आग दुर्घटनांची संख्या पाहता या वेगळ्या सेलच्या मर्यादाही दिसून आल्या आहेत.

आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये जातो तिथं फक्त आत जाण्याचा मार्गच आपल्याला माहीत असतो, परंतु आपत्कालीन स्थितीत बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग जाणून घेण्याची कुणाचीच मानसिकता नसते. कारण आपल्यातही अग्निसुरक्षेबाबत फारसे गांभीर्य नाही.... त्यामुळे सगळ्या गोष्टी केवळ व्यवस्थेवर ढकलून मोकळे होऊ नका... थर्टी फर्स्टच्या पार्टीला जाताना बाहेर पडण्याचा मार्गही आधी शोधून ठेवा...