Youths Heckled On Byculla Bridge: मुंबईमध्ये भायखळ्यातील वाय-ब्रीजजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील 3 व्यक्तींनी काही मुस्लीम तरुणांना मारहाण केल्याचा दावा भायखळ्याचे माजी आमदार व एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारीस पठाण यांनी केला आहे. "मंगळवारी रात्री बाईकवरुन जाणाऱ्या 3 मुस्लीम तरुणांना रात्री दीडच्या सुमारास या ब्रीजवर काही मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी दाढी, टोपी पाहून थांबवलं आणि जय श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितलं. त्यांनी नकार दिला असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या हातातील मोबाईल खेचून घेण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी एक 15 वर्षांची एक अल्पवयीन मुलगी समोर आली असता तिच्याबरोबरही गैरवर्तन करण्यात आलं," असा आरोप वारीस पठाण यांनी केला आहे.
"हे असं वागून या लोकांना देशाला कोणत्या दिशेने न्यायाचं आहे. अशाप्रकारच्या घोषणा देण्याची बळजबरी का केली जात आहे?" असा सवाल वारीस पठाण यांनी केला आहे. "ही घटना समजल्यानंतर एआयएमआयएमचे लोक त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्या ठिकाणी मुंबई पोलिसही आले. त्यांनी तपास करुन एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये तिघांना अटक करण्यात आली आहे," असं वारीस पठाण यांनी सांगितलं. अल्पवयीन मुलीबरोबर छेडछाड केल्याने पॉस्को कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"मद्यपान करुन तुम्ही प्रभू रामचंद्रांबद्दल कोणती आस्था दाखवू इच्छित आहात?" असा सवालही वारीस पठाण यांनी उपस्थित केला आहे. "दारुच्या आधारावर प्रभू रामचंद्रांचं नाव घेऊन तुम्ही श्रद्धा असलेल्यांचाही अपमान करत आहात," असं वारीस पठाण म्हणाले आहेत. "महाराष्ट्रात जाणूनबुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा आरोपही वारीस पाठण यांनी केला.
Mumbai Byculla. कल रात के हमले में घायल पीड़ित के परिवार वालों के साथ अग्रीपाड़ा पुलिस स्टेशन के सीनियर और Addl com ऑफ़ पुलिस से मुलाक़ात की।
गुंडों के ख़िलाफ़ non bailaible धाराएँ लगा कर उनको अरेस्ट किया है।नाबालिग महिला के साथ बदतमीज़ी करने पर pocso Act भी लगा दिया गया है।… pic.twitter.com/lWGxPzHR46— Waris Pathan (@warispathan) January 31, 2024
हिंदू सभांच्या नावाखाली बाहेर लोकांना बोलावलं जात असून त्यांना हिंसेसाठी माथी भडकवली जात असल्याचा आरोप वारीस पठाण यांनी केला आहे. केवळ एफआयआर दाखल होतात. मात्र कारवाई केली जात नाही, असा दावाही वारीस पठाण यांनी केला आहे.
पीडित तरुणांच्या तक्रारीवरून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्या चौकशीत घटना घडल्याचं स्पष्ट होताच त्यांना अटक करण्यात आली. अनुज मयेकर, उमेश परब आणि ऋतिक राठोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती फ्री प्रेस जर्नलने आग्रीपाडा पोलिसांच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. सर्व आरोपी बेरोजगार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.