नवी मुंबई मनपा मुख्यालयात भंगार गाड्या टाकल्याने खळबळ

नवी मुंबई महापालिका जोरदारपणे स्वच्छ भारत अभियान राबवत आहे.

Updated: Jan 8, 2019, 07:40 PM IST
नवी मुंबई मनपा मुख्यालयात भंगार गाड्या टाकल्याने खळबळ title=

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका जोरदारपणे स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. यासाठी शहरातील अस्वछता  लपवण्याचा काम पालिका करीत आहे की काय असा प्रश्न पडत आहे. नवी मुंबईतील मलबार हील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच या आलिशान वसाहती जवळील मोकळ्या भूखंडावर पालिका अधिकाऱ्यांनी बेवारस आणि भंगार गाड्या नेवून ठेवल्याने या परिसरातील रहिवासी चांगलेच संतापले आहेत. अखेर स्थानिक नगरसेवकांनी वारंवार मागणी करून देखील या गाड्या हटवत नसल्याने अखेरीस या गाड्या थेट मनपा मुख्यालयात टाकल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पामबीच मार्गावर मोराज रेसिडेन्सी समोर मोकळ्या मैदानात मनपा प्रशासनाने अचानक भंगार आणि बेवारस गाड्या नेवून ठेवल्याने स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांना या भंगार गाड्या हटवण्यासाठी मागणी केली पण वारंवार तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याने अखेर स्थानिक नगरसेविका वैजयंती भगत आणि माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी या भंगार गाड्या टो करून थेट मुख्यालयात नेवून अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. खुद्द नगरसेविका भगत यांनी या भंगार गाड्या पालिका मुख्यालयात आणून ठेवल्यावर अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. 

स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेवून दोन दिवसात या भंगार गाड्या काढून घेण्याचे निर्देश दिले. या गाड्या मनपा मुख्यालय परिसरात आणल्यावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवून मनपाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. अखेर या गाड्या लवकर हटवू असे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी 2 दिवसात कारवाई नझाल्यास सर्व गाड्या मुख्यालयात आणू असा इशारा स्थानिक नगरसेविकेने दिला तर 2 दिवसात कारवाई करू असे आश्वासन स्थायी समिती सभापतींनी दिले.