मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलद्वारे दान केलेले अवयव ठराविक काळात ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून परळच्या ग्लोबल रुग्णालयापर्यंत आणण्यात यश आले आहे. दान केलेले अवयव लोकलने घेऊन जाण्याची ही पहिलीच घटना आहे. अवयव दान केल्यानंतर तो योग्य तो व्यक्तीपर्यंत पोहचण्याची प्रक्रिया जलद गतीने व्हावी यासाठी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून अवयव पोहचवले जातात.
मात्र भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारचे दान केलेले अवयव लोकल सेवेच्या माध्यमातून पोहोचविण्यात आले आहे. शुक्रवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयातून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत अवयव पोहोचविण्यात आले. त्यानंतर ३ वाजून ०४ मिनिटांनी लोकल प्रवासाला सुरुवात झाली आणि दादर रेल्वे स्थानकात ३ वाजून ३३ मिनिटांनी हे अवयव सुखरुप पोहोचले. त्यानंतर त्वरित दादर ते परळ दरम्यान ग्रीन कॉरीडॉरव्दारे अवयव रूग्णालयात यशस्वीपणे पोहचविण्यात आले.
ठाण्यातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून व्यक्तीला ब्रेनडेड असे घोषित करण्यात आले. त्या व्यक्तीने अवयवदानाचा निर्णय झाल्याने यकृ आणि दोन किडन्या दान करण्यात आल्या. त्यानुसार प्रत्यारोपणासाठी किडन्या लो. टिळक आणि जसलोक रूग्णालयात तर यकृत परळच्या ग्लोबल रूग्णालयात देण्यात आले. संसर्ग होऊ नये तसेच योग्य त्या वेळेत अवयव पोहचावा यासाठी ग्रीन कॉरिडॉरची सुविधा असते. लोकलने नेताना गर्दीत अवयव पडण्याचा धोका असून याबाबत ज्यूपिटर रूग्णालयातील डॉक्टरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.