Sakshi Shivdasani Vada Pav Comment : मुंबईकर आणि वडापाव (Vada Pav) हे जणू समीकरणच बनलं आहे. मुंबईतल्या गल्लोगल्लीत वडापाव मिळतो. मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव म्हणजे जगात भारी मानला जातो. रस्त्यावर राहणारा असो किंवा श्रीमंत व्यक्ती वडापाव सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. इतकंच काय तर वडापावला जागतिक मान्यताही मिळाली आहे. जगभरातील 50 पदार्थांच्या यादीत वडापावचा समावेश करण्यात आला आहे. वडापावचं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पण मुंबईत राहाणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने (Influencer) चक्क वडापाववर टीका केली आहे. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी प्रचंड संतापले आहेत.
कोण आहे ती इन्फ्लुएंसर
या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं नाव साक्षी शिवदासानी (Sakshi Shivdasani) असून ती कंटेंट क्रिएटर आहे. इन्स्टाग्रामवर तीचे चार लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. एका टॉक शोध्ये तीने मुंबईच्या लोकप्रिय वडापावर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झालाय. या कार्यक्रमात होस्टने साक्षीला तू मुंबईकर आहेस, म्हणजे तुला वडापाव आवडत असेल असा प्रश्न विचारला. यावर साक्षीने वडापाव कचरा असल्याचं म्हटलंय. इतकंत नाही तर वडापावचा मी मनापासून तिरस्कार करते, असंही तीने म्हटलं आहे. उकडलेले बटाटे आणि ब्रेड यांचा काहीच संबंध नसल्याचंही तीने सांगितलं.
साक्षीने दिलेलं उत्तर ऐकून कार्यक्रमाचा होस्टही हैराण झाला. कदाचित होस्टलाही साक्षीचं हे उत्तर आवडलं नाही. त्याने साक्षीला चांगलंच सुनावलं. पहिली गोष्ट म्हणजे बटाटे उकडलेले नसतात तर ते तळले जातात आणि त्यासाठी ब्रेड नाही तर पाव वापरला जातो, तिखट-गोड चटणीसोबत तो दिला जातो, असं होस्टने सांगितंल. पण साक्षी आपल्या मतावर ठाम होती. तीने वडापाव बकवास असल्याचं सांगितलं. समोसा पाव हा वडापावपेक्षा जास्त टेस्टी लागतो असंही साक्षीने सांगितलं.
thehavingsaidthatshow या इन्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 20 लाख लोकांनी पाहिला असून 47 हजार लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी साक्षीला चांगलंच ट्रोल केलं आहे. एका युजरने म्हटलंय वडापावमधली फक्त चटणी तुझ्या शब्दांपेक्षा 10000000000000 टक्के जास्त चांगली लागते. तर एकाने म्हटलंय, तु वडापावला जे बोललीस तेच आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो.