मुंबई : किर्ती व्यासप्रकरणी नवा गौप्यस्फोट झाला आहे. दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या किर्ती व्यासची हत्याच झाल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणी किर्तीच्या दोघा सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेले सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांना किर्ती व्यासची हत्या केल्या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष २ ने बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे अंधेरी येथील ज्या बि ब्लंट नावाच्या सलोनमध्ये किर्ती फायनान्स मॅनेजर होती त्याच सलोनमध्ये सिद्धेश आणि खुशी कार्यरत होते. किर्तीच्या हत्येचं कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
किर्ती अंधेरी येथील बि. ब्लंट सलोनमध्ये फायनान्स मॅनेजर होती. १६ मार्चला नेहमीप्रमाणे कीर्ती घरून कामावर निघाली खरी मात्र कधी परतलीच नाही. तिच्या घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. जागोजागी पोस्टर्स लावले, सोशल मीडियावर केंपेन केलं पण कसलाच उपयोग होत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी किर्तीचा कसून शोध घेतला. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गाडीत किर्तीच्या रक्ताचे शिंतोडे सापडले. पण अजून किर्तीचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. किर्तीचा मृतदेह कुठे फेकण्यात आला? याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सिद्धेशवर केलेल्या कारवाईमुळेच किर्तीची हत्या झाली की आणखी काही कारण होतं याचा पोलीस शोध घेत आहेत.
पाहा व्हिडिओ