मुंबई : कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आणखी दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे धारावीत कोरोना बळींची संख्या ७ झाली असून कोरोनाचे ५५ रुग्ण आढळून आले आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत लोक अत्यंत दाटीवाटीने राहतात आणि या भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला तर परिस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या भागात अनेक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
धारावीत कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यात आता आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. तर कोरोनामुळे धारावीतील एका ५२ वर्षीय रुग्णाचा सायन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर दुसऱ्या ५२ वर्षीय रुग्णाचा केईएम रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला.
धारावीत एका गारमेंट व्यावसायिकाला आधी कोरोनाची बाधा झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर धारावीत कोरोनाचा शिरकाव आणखी वाढला. विशेष म्हणजे धारावीत पहिला बळी गेलेल्या गारमेंट व्यावसायिकाचं दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकज कनेक्शन पुढे आलं होतं. मरकजहून आलेल्या काही लोकांना धारावीतील गारमेंट व्यावसायिकानं आसरा दिला होता. आणि त्यांच्याकडूनच गारमेंट व्यावसायिकाला कोरोनाची लागण झाली असावी अशी शक्यता आहे. निजामुद्दीनहून आलेले हे लोक नंतर केरळला गेल्याचे समजते.
त्यानंतर धारावीत एका डॉक्टरला, एका नर्सलाही कोरोनाची लागण झाली होती. तसेच अन्य नागरिकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे धारावीत मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यास महापालिकेने सुरुवात केली.
महापालिकेने धारावी भाग सील केला आणि त्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणात तपासणीही सुरु केली. मात्र तरीही धारावीत लोक लॉकडाऊनचं पुरेसं पालन करत नसल्याचं चित्र पुढे आलं होतं.
दरम्यानच्या काळात धारावीत कोरोनामुळे एकापाठोपाठ एक असे सात बळी गेले आहेत. त्यामुळे धारावीत कोरोनाचा धोका वाढतच असून त्यावर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे.
धारावीत लॉकडाऊन कठोर करून सर्व रहिवाशांना जेवण पुरवणे, भागातील शौचालयांचं निर्जतुंकीकरण करणे, ड्रोणद्वारे रहिवाशांवर लक्ष ठेवणे, तसेच रहिवाशांची मोठ्या प्रमाणात तपासणी करून कोरोनाचे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करणे आणि विशेष म्हणजे या भागात फैलावणाऱ्या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे यासाठी महापालिका प्रशासन राबत आहे.