उद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबियांचा हवाला ऑपरेटर एकच?

किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप, सांगितलं 'त्या' हवाला ऑपरेटरच नाव

Updated: Feb 25, 2022, 12:42 PM IST
उद्धव ठाकरे आणि गांधी कुटुंबियांचा हवाला ऑपरेटर एकच? title=

मुंबई :  मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक केल्यानंतर आता शिवसेनेच्या (ShivSena) आणखी एका नेत्याची चौकशी सुरु झाली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या निवासस्थानावर इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाने आज सकाळ छाप टाकला असन त्यांची चौकशी सुरु आहे. 

या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) आणि यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी जो फॉर्म भरला तिथूनच  १९ बंगल्यांची कहाणी सुरु झाली. त्या फॉर्ममध्ये उद्धव ठाकरे यांनी आपली मालमत्ता घोषित केली. त्यात १९ बंगल्यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी लपवली.

यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनीही कोट्यवधी रुपयांची मालमत्ता लपवली. यासंबंधी काही माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाली. काही माहिती आमच्या सारख्या अॅक्टिव्हिस्टने दिली. यशवंत जाधव यांनी दुबईत सिनर्जीत व्हेंचर्स आणि सईद डोन शारजा या २ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या दोन्ही कंपन्या यशवंत जाधव कुटुंबियांच्या असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. प्रधान डेवलपर्स नावाच्या शेल कंपनीद्वारे यशवंत जाधव यांनी 15 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

महापालिका कंत्राटदारांकडून यांना रोकड्यात पैसे मिळतात. त्यांचा जो हवाला ऑपरेटर आहे त्याचं नाव उदयशंकर महावर आहे. हा जो व्यक्ती आहे तो गांधी परिवाराचाही हवाला ऑपरेटर आहे. यातून उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचे संबंध उघड होतात. गांधी परिवारानेच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची भेट घालून दिली असेल. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी यशवंत जाधव यांच्यासोबत भेट करुन दिली असेल या बद्दल माहिती नाही, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

यशवंत जाधव यांचा हवाला ऑपरेटर उदयशंकर महावर यांनी ही माहिती दिली आहे की यशवंत जाधवचा माणून रोकडे पैसे द्यायचा. यातला काही पैसा युएईला पाठवण्यात आला, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.