मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने (BJP) एल्गार पुकारला आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्त्वात आझाद मैदान ते मेट्रो थिएटरपर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला आहे. भाजपचे दिग्दज नेते आणि हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले.
यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत ठाकरे सरकार आणि शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला.
देशद्रोह्यांविरोधात संघर्ष
मुंबई करता, महाराष्ट्र करता, संपूर्ण देशाकरता, संघर्ष करण्याकरता आझाद मैदानावर उपस्थित आहात. हा साधा संघर्ष नाहीए, हा देशभक्तांचा संघर्ष आहे, देशद्रोह्यांविरोधात हा संघर्ष आहे, पाकिस्तानधार्जिण्या लोकांविरोधात हा संघर्ष आहे. दाऊदच्या साथीदारांविरोधात हा संघर्ष आहे, असं उपस्थितांना उद्देशून देवेंद्र फडणवीस म्हणाले.
माझ्यासमोर बसले आहेत ते छत्रपतींचे मावळे आहेत, हे मावळे हार मानणार नाही, हे मावळे झुकणार नाही. हे मावळे थकणार नाही. जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी घोषणा फडणवीस यांनी केली.
केवळ राजकारणाकरता आम्ही बोलत नाही. ही घटना राज्याकरता लाजीरवाणी आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खानवर आरोप आहे त्याने याकुब मेमनसोबत बसून पूर्ण बॉम्बस्फोटाचा कट केला. हसीना पारकर जीच्या नावाने दाऊद इब्राहिम महाराष्ट्रात आणि देशात रिअल इस्टेटचा धंदा चालवून पैसा जमा करुन त्याच पैसाच्या माध्यमातून या मुंबईत बॉम्बस्फोट घडवत होता. त्या हसीना पारकराचा फ्रंट मॅन सलीम पटेल आणि शहवली खान या दोघांनी मिळून बॉम्बस्फोटाचा कट रचला.
बॉम्बस्फोट करुन शेकडो लोकांना मारून जेलमध्ये आहे अशा लोकांकडून नवाब मलिक यांनी जमीन विकत घेतली. ती देखील २५ रुपये स्केअर फिटने या हरामखोरांकडून नवाब मलिकांनी व्यवहार केला.
तुम्हाला लाज का वाटली नाही, मी जे विक्री पत्र दाखवल त्यात पहिला फोटो आहे, शहावली खानचा, दुसरा फोटो आहे सलीम पटेलचा आणि तिसरा फोटो आहे नवाब मलिक यांच्या मुलाचा आहे. लाज का नाही वाटली मुंबईच्या हत्यारांसोबत व्यवहार करताना, असा घणाघात फडणवीस यांनी केला. ज्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांचा आक्रोश तुम्हाला का दिसला नाही. घायाळ झालेली मुंबई तुम्हाला का नाही दिसली असा सवाल फडणवीस यांनी यावेळी विचारला.
मला आश्चर्य वाटतं आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागतोय, आणि पवार साहेब बोलताय आम्ही राजीनामा घेणार नाही, उद्धवजी पण पाठिंबा देत आहेत. उद्धवजी सरकार तुम्हाला लखलाभ, पण एक दिवस बाळासाहेब ठाकरे यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की अशा प्रकाराचा व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात होता ज्याने मुंबईचे चिथडे चिथडे केले त्या वेळी तुम्ही काय उत्तर द्याल?
आम्ही तर त्यावेळी बाळासाहेबांना सांगू आम्ही संघर्ष केला, पण काय करणार आपलेच सुपूत्र होते, ते सत्तेकरता एवढे आंधळे झाले होते की ते त्याचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहित होतं, की राजीनामा घेतला तर माझं सरकार जाईल.
अनिल देशमुख, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला तर नवाब मलिकांचा राजीनामा का नाही. हे सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालतं का? हा आमचा सवाल आहे. कोणाच्या दाड्या कुरवाळताय म्हणून तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाही. हे आम्हाला समजलं पाहिजे,
पण तुम्ही राजीनामा घेतला नाही तर आम्ही संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत देशद्रोह्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष संपणार नाही.
आमच्याविरोधात षडयंत्र करताय, काल तुमचं षडयंत्र उघड केलंय, पण आम्ही घाबरणारे नाही, आम्ही मोदींचे सैनिक आहोत. एका नरेंद्र मोदींना संपवण्यासाठी तुम्ही सगळे एकत्र आला आहात, पण मोदींजींना संपवू शकला नाहीत, कारण करोडो लोकांचे आशिर्वाद आहेत.
कालचा बॉम्ब तर पहिली बॉम्ब आहे, असे अनेक बॉम्ब ठेवले आहेत, ज्या ज्यावेळी आवश्यक आहेत त्यावेळी ते बॉम्ब फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.