आदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Mar 4, 2024, 10:12 PM IST
आदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला title=

Uddhav Thackeray Nepotism: तुम्हाला तुमच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं आहे, असा माझ्यावर आरोप केला जातो.  हो करायचं आहे त्याला मुख्यमंत्री पण माझ्या मुलाला मतं दिली तर निवडून येईल ना? ते काय बीसीसीआयचं अध्यक्षपद आहे का? जय शाह याचं क्रिकेटमधलं योगदान काय? काय सचिन आणि विराटला खेळायला शिकवलं काय? असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. उरणमधल्या सभेत ते बोलत होते. गेल्यावेळी भाजपनं आपल्यासोबत अधिकृत गद्दारी केली होती. आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.

तुम्ही जनतेत उभे राहा आणि सांगा शिवसेना कोणाची? त्यांच्याकडे सीबीआय, ईडी, लवाद आहेत. ते म्हणतील तसे निर्णय देतायत. मर्द मावळे तुमचे गुलाम होणार नाही. निवडणूक घेऊन दाखवा. मी सुद्धा राजकारण बघत मोठं झालंय. घराणेशाही परिवारवाद, अमित शाह आणि मोदींना आव्हान तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा आणि मी माझ्या सांगतो, असे आवाहन ठाकरेंनी केले. स्वातंत्र्य लढ्याचा कुठलाही त्यांना संबंध नव्हता अशी ही माणसं आहेत. भाजप तर तेव्हा नव्हताच. मुस्लिम देखील माझ्यासोबत देश वाचवण्यासाठी सोबत आले आहेत. मोदींनी इंडिया आघाडीवर टीका केली. आम्हाला चले जाओ असे म्हणतायत. श्यामाप्रसाद मुखर्जींनी चले जाओ कशी चिरडून टाकावी असं पत्र लिहिलं होतं, असे ते म्हणाले. 

नितीश कुमार बोलले होते संघ मुक्त भारत करुया.  कपिल पाटील यांनी सांगितलं नितीश कुमार गेलेत तर जाऊ द्या, पण मी तुमच्या सोबत आहे. पण चांगलं सरकार तुम्ही पाडलं.जात पात धर्म बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 1977 साली देखील अशीच वेळ आली होती. सुरुवातीला शिवसेनेने पाठिंबा जरुर दिला होता मात्र नंतर काही गोष्टींना विरोध केला होता. नंतर वाहत्या गंगेत हात धुवायला भाजप, जनता पक्ष देखील आलेला.  सर्व काय हिंदुधार्जीणे तुमच्यासोबत होते काय? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

आम्ही आता एकत्र आलो तर तुमच्या पोटात का मुरडा येतो. आमच्या साध्या कार्यकर्त्यांवरील केसेस टाकता. पोलिस त्यांच्या मागे लावता. आत्ताचे राज्यकर्ते उद्या नसणार असे त्यांनी पोलिसांना उद्देशून म्हटले. 

काश्मीर ते कन्याकुमारी मला आक्रोश दिसतोय. हे 100 ते 200 च्या वर जाऊ शकणार नाहीत. भाजपनं ईव्हीएमचा घोटाळा करत जिंकूनच दाखवावं, असेही ते म्हणाले. 

गडकरींचा काहीतरी सन्मान ठेवा 

काल 195 जागांची यादी जाहीर झाली पहिल्या यादीत त्याला स्थान मिळालं ते नाव कृपाशंकर सिंह यांचं आहे. जेव्हा नरेंद्र मोदींचे नाव माहिती नव्हतं १९८८ साल असेल. तेव्हा मुंडे, महाजन आले आणि आपण युती केली. मुंडे आणि महाजन यांच्यानंतर गडकरी यांचं नाव येतं. गडकरींनी आपल्या युतीच्या काळात काम केलं. संघ, भाजपचा निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. पहिल्या यादीत त्यांचे नाव नाही, काही तरी त्यांचा  सन्मान ठेवा असे ते भाजपला उद्देशून म्हणाले.

भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सांगायचे आहे. संघाला आता 100 वर्ष होतील. निखारे ठेवत पक्ष तुम्ही वाढवला. एका व्यक्तीनं भाजपमध्ये एका राज्यात सत्ता आणली. लोक संघाचा कार्यकर्ता म्हटल्यावर मारायची पण आम्ही पाय रोवले आणि जिंकलो. आमच्यातल्या गद्दाराला घेतलं, 70 हजार कोटीच्या घोटाळेबाजाला घेतलं. संघ आणि भाजपच्या निष्ठावंतांना जागा राखीव ठेवणार आहात की नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

भाजप मोदींनी केराच्या टोपलीत टाकायला निघालं होतं. त्यावेळी बाळासाहेब यांनी वाचवले. मी त्यांचाच मुलगा आहे. मला घराणेशाही तुम्ही शिकवणार? भाजपची पालखी आम्ही वाहिली ती हिंदुत्वासाठी भाजप पक्ष कोण चालवतं? नड्डा की तुम्ही? तुम्ही आमच्या घराणेसंदर्भात बोललात तर आम्हाला देखील बोलावं लागेल. त्यामुळे त्यामुळे जनतेच्या मुलांच्या संदर्भात बोला, असे आवाहन त्यांनी केले.