दसरा मेळावा शिवतीर्थावरच, कोणताही संभ्रम नाही : उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्याबाबत पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Updated: Aug 29, 2022, 03:34 PM IST
दसरा मेळावा शिवतीर्थावरच, कोणताही संभ्रम नाही : उद्धव ठाकरे title=

मुंबई : मुंबई महापालिकेनं अजूनही शिवर्तीर्थावरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय घेतला नसला तरी शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ज्यांना संभ्रम करायचा त्यांना करू दे असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी देण्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. मात्र महाराष्ट्रात उलटं घडतंय असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

'आज संघ परिवारातील लोक सेनेत आलेत. सत्ताधारी पक्षाकडे प्रवेशासाठी रांग लागते. परंतु गद्दाराची माती ही गद्दारांनाच जन्म देते. हिंदुत्व सोडले म्हण-यांना हे उत्तर आहे. मुस्लीम समाजातील लोकही येत आहेत. तिकडं भ्रामक हिंदुत्व दाखवले जात होते. खरे हिंदुत्व आमचाकडे असल्यानं त्यांना मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत.'

'दसरा मेळावा आमचाच होणार. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. गद्दारी कशासाठी केली हे त्यांनाही समजले नाहीय. शिवसेना व शिवसैनिक आहे तिथं ठाम आहे. शिवसेना रस्त्यावरील वस्तू नाही, की कुणीही उचलून खिशात टाकावी. सेनेला ५६ वर्षे झालीत,असे किती ५६ आले गेले तरी आम्हाला फरक पडत नाही. शिवसेना ही शिवसैनिकांच्या रक्ताने मोठी झाली आहे.'

गुलाम नबी आझाद यांच्यावर टीका

'घर सोडणारे काहीतरी टीका करतातच. आनंदी असल्यामुळं कोणी घर सोडत नाही. आमच्यातून निघून जाणारे गद्दार ही तीच टीका करत आहेत.'