उद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचे संयमी वारसदार

सत्तासंघर्षातले आणखी एक हिरो

Updated: Nov 22, 2019, 04:52 PM IST
उद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचे संयमी वारसदार title=

मुंबई : शिवसेनाप्रमुखांना दिलेलं मुख्यमंत्रिपदाचं वचन पूर्ण करीन हा निर्धार करून तो पूर्णत्वाकडे नेणाऱ्या उद्धव ठाकरे या सत्तासंघर्षातले आणखी एक हिरो आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न विचारणाऱ्या टीकाकारांना गेल्या १६ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीतल्या कामगिरीनं उद्धव यांनी चोख उत्तर दिलं आहे.

२००३ साली महाबळेश्वर अधिवेशनात उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार कोण याचाही फैसला झाला. मग सुरु झाली ती शिवसेनेच्या भविष्याची चर्चा. बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक शिवसेनेचं नेतृत्व मवाळ स्वभावाचे उद्धव ठाकरेंना पेलवेल का याबाबत सतत चर्चा सुरु राहिली. पण उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेना पुढे नेली, त्यांच्या पद्धतीनं. कार्याध्यक्ष झाल्यानंतर दोनच वर्षांत त्यांना शिवसेनेतून आव्हान मिळालं ते नारायण राणेंचं. आणि पाठोपाठ घरातूनच राज ठाकरेचं. शिवसेना फुटली यावेळी कधी नव्हे ते बंडखोर नेते आक्रमक होते आणि शिवसेना काहीशी मवाळ. पण उद्धव ठाकरेंनी हे आक्रमक वादळ संयमानं थोपवलं ते ही त्यांच्या स्वभावाप्रमाणं.

९० च्या दशकात युतीचं सरकार सत्तेवर होतं, तेव्हापासून उद्धव राजकारणात सक्रिय झाले असले, तरी २००२ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी जबाबदारी घेतली आणि महापालिकेची सत्ता कायम राखली. त्यानंतर राणे आणि राज ठाकरेंच्या बंडानंतरही २००७, २०१२ आणि २०१७ च्या सलग तीन निवडणुकांमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिका शिवसेनेच्या ताब्यात ठेवण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं. २००९ साली उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चे काढले आणि लोकसभेत ११ जागा मिळवल्या. त्यावर्षी विधानसभा निवडणुकीत चौथ्या स्थानावर गेल्यानं शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद गमवावं लागलं. 

पण २०१४ साली भाजपबरोबर युती न करता लढूनही दुसऱ्या क्रमांकाच्या ६३ जागा जिंकल्या हे उद्धव यांचं मोठं यश. त्यामुळे शिवसेनेला दुय्यम दर्जाची का होईना पण राज्यात सत्ता मिळाली. २०१२ साली महापालिकेत वेगळं लढूनही मुंबई, ठाणे स्वबळावर मिळवलं. सत्तेत राहूनही भाजपला आवाज देण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला शिवसेनेला युती करावी लागली. त्याचा फायदा शिवसेनेलाही झाला. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांना आव्हान होतं ते प्रामुख्यानं भाजपाचंच. पण ते त्यांनी थोपवलं कधी संयम दाखवून तर कधी लढून.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं निधन होऊनही आता सात वर्षे लोटली. या काळात उद्धव ठाकरेंनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं आहे. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आधी शिवसेनेतून आणि घरातून मिळालेलं आव्हान मोडून काढलं. आणि त्यानंतर त्यांना २५ वर्षे मित्र राहिलेल्या भाजपचं आव्हान मिळालं. ते तितकंच मोठं होतं. शक्तीशाली, आक्रमक पण ते देखील उद्धव यांनी त्यांच्या पद्धतीनं थोपवलं, थेट त्यांचे राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून. यावेळी उद्धव यांची शिवसेना आक्रमक होती आणि मोदी-शाहांची भाजप संयमी होती. संयमी उद्धव यांनी प्रसंगी लढवय्येपणा दाखवला. शिवसेनेला पुन्हा सत्तेपर्यंत आणून ठेवलं. 

बाळासाहेबांनी पुत्रप्रेम पाहिलं म्हणणाऱ्यांना उद्धव यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांची चमक दाखवून गप्प केलं. आजवर उद्धव युद्ध लढले आणि यशस्वी केले. पण त्यांनी शिवसेनेला दाखवलेला नवा मार्ग तितकाच योग्य आहे का? याचं उत्तर यथावकाश मिळेलच..