VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...

Uddhav Thackeray On Congress Stage: काँग्रेसच्या मंचावर उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील उपरण्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

Pravin Dabholkar | Updated: Aug 20, 2024, 05:58 PM IST
VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले... title=

Uddhav Thackeray On Congress Stage:  ठाकरे गट हा काँग्रेसच्या गळ्यातील ताईत झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनता यावं म्हणून ठाकेर गांधी परिवाराच्या भेटीला गेले अशी टीका देखील करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज काँग्रेसच्या मंचावर दिसले. यावेळी त्यांच्या गळ्यातील उपरण्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सद्भभावना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, रमेश चेनिथल्ला,नाना पटोले, विजय वडेट्टीवार,सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस नेते मंचावर उपस्थित होते. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते.

मी काँग्रेसचे उपरणेही घातले

मी चिमटा काढून बघितला की, खरंच मी काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजर आहे का ? मी काँग्रेसचे उपरणेही घातले,उद्या नक्की याची बातमी होईल. माझ्या वडिलांची काँग्रेस विरोधातील भाषणे ऐकून मोठा झालो, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  एका बाजूला सद्भभावना आणि दुसरीकडे सूडभावना आहे. आम्ही मात्र सद्भभावनेच्या बाजूने आहोत. आम्ही विरोधात असताना काँग्रेस कधीच सूडभावनेने वागली नाही. विरोधकांवर लाठी चालवायची नाही असे आदेश बाळासाहेबांनी तेव्हा मनोहर जोशींना दिलेले होते. तेव्हा विरोधकांच्या घरी ईडी कधी आली नव्हती, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

राजीवजी कळायला वेळ लागला

राजीवजी कळायला वेळ लागला. ते कधी सूडभावनेने वागले नाहीत, असे ठाकरे म्हणाले. आमचा दुरूपयोग करून आम्हाला संपवायला निघालेले हे कसले मित्र? असे ते भाजपला उद्देशून म्हणाले. कुठल्याही लसीकरणावर राजीवजींचा फोटो नव्हता. समस्येकडे पाठ नाही दाखवली. राहूलजींना पाठीमागे बसवले, ही यांची संस्कृती, असे ते म्हणाले. नारा न देता 400 पार त्यांनी करून दाखवले होते. सत्तेचे विकेंद्रीकरण त्यांनी केले. वन नेशन वन इलेक्शन..मग महाराष्ट्र नेशनमध्ये नाही, असे ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ

बदलापूर घटना संताप आणणारी

बदलापूर घटना संताप आणणारी आहे. उलटे सटकवून फाशी द्यायला हवी.लेकरे सुरक्षित नसतील तर तुमचे 1500 नको. मी भाजपचे हिंदुत्व मानायला तयार नाही.यांचा हा सत्ताजिहाद आहे.दुस-या धर्माचा आहे म्हणून अन्याय करणार नाही. या निवडणुकीत त्यांचा सुपडासाफ करायचा आहे. त्यांना एकजूट आणि वज्रमूठ दाखवू असं ते म्हणाले. 

काँग्रेसच्या उपरण्यावरून नेमके काय झालं ?

काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना काँग्रेसचे उपरणे घातले.  काही वेळ उपरणं उद्धव ठाकरे यांनी गळ्यात ठेवलं होतं.त्यानंतर थोड्या वेळाने शरद पवार हे सभास्थळी आले.शरद पवार यांनी गळ्यात घातलेलं उपरण काढलं. त्याचवेळी उद्धव ठाकरेदेखील काँग्रेसचे उपरणे गळ्यातून काढताना दिसले. उपरण बाजूला काढल्यानंतर भाई जगताप यांनी ते उपरणं गळ्यात ठेवा असा आग्रह करताना दिसले. थोड्या वेळाने शरद पवारांनी उपरणं गळ्यात घातलेलं दिसलं. संजय राऊत यांनीदेखील उपरणं तसंच गळ्यात ठेवलं होतं. उद्धव ठाकरे मंचावर भाषण करायला आले तेव्हा त्यांच्या गळ्यात काँग्रेसचं उपरण दिसलं नाही. त्यात भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपरण्याचा उल्लेख केला. यामुळे संपूर्ण वेळात सर्वांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या उपरण्यावरच राहिले.