उद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !

उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत. 

Updated: Nov 28, 2019, 09:41 AM IST
उद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ ! title=

मुंबई : ज्या मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेनं अट्टहास केला ते मुख्यमंत्रिपद उद्धव ठाकरेंना मिळालंय. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय संधी असणार आहे. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री ठरलाय. अब की बार उद्धव सरकार. हे निश्चित झाले आहे. आज शिवाजी पार्कवर त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. ज्यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ आला आहे. 

उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असं उद्धव ठाकरे सातत्यानं सांगत राहिले. आणि त्यांनी ते करुन दाखवलं. महाराष्ट्राच्या राजकारणात रिमोट कंट्रोलवाले ठाकरे अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मिळणं ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी सुवर्णसंधी असणार आहे. १९९५ ते १९९९ हा साडेचार वर्षांचा काळ वगळता शिवसेनेला एवढं मोठं पद कधीच मिळालं नाही. त्यामुळं शिवसेनेला आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद मिळणं हे राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज्याचं नेतृत्व करण्याची संधी 

उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावं लागणार आहे. त्या निमित्तानं दुसरा ठाकरे निवडणुकीच्या आखाड्यात उतरेल. आतापर्यंत शिवसेनेचं नेतृत्व करणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात वेगवेगळ्या कल्पक योजना राबवण्यासाठीही त्यांना वाव मिळणार आहे. मुख्यमंत्रीपदच हातात असल्यानं दुसऱ्या कुणाचा अंकुश राहणार नाही. याच निमित्तानं राज्यात ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे तिथं शिवसेना मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. 

राजकीय दूरदृष्टीपणा 

शिवसेनेच्या विस्तारासाठी यासारखी सुवर्णसंधी शिवसेनेला दुसरी कोणतीही नाही. मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे विराजमान झाल्यानं राज्याचा प्रशासकीय गाडा हाकण्यास मिळेल. प्रशासन चालवण्याचा हा अनुभव उद्धव ठाकरेंना नवी राजकीय उंची मिळवून देईल असं राजकीय अभ्यासक सांगतात. राजकीय संधी वारंवार चालून येत नाही. आलेली संधी कॅश करून उद्धव ठाकरे राजकीय दूरदृष्टीपणा दाखवला आहे.

एकाचवेळी वडील मुख्यमंत्री आणि मुलगा आमदार

उद्धव ठाकरेंच्या निमित्ताने पहिले ठाकरे मुख्यमंत्री होतील. आणि एकाचवेळी वडील मुख्यमंत्री आणि मुलगा आमदार असंही महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडेल. चला महाराष्ट्र सज्ज झाला आहे. अब की बार उद्धव सरकार. 

१ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आज ५३ वर्षांची 
२ - उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाळासाहेबांमध्ये भिन्नस्थळे अधिक
३ - बाळासाहेब रोखठोक तर, उद्धव भीडस्त 
४ - बाळासाहेब फर्डे वक्ते तर, उद्धव आक्रमक
५ - उद्धव ठाकरेंची हौशी छायाचित्रकार ओळख 
६ - उद्धव यांचा गेल्या १०-१५ वर्षांत राजकारणात वेगळा ठसा 
७ - उद्धव यांच्या अगोदर शिवसेनेत राज ठाकरे सक्रिय
८ - वक्तृत्वापासून अनेक बाबतीत उद्धव ठाकरे मागे
९ - विद्यापीठातील राजकारण,राजकीय व्यंगचित्रकारितेत राज यांचा ठसा
१० - शिवसेनेच्या शिबीरात उद्धव यांची कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती
११ - नारायण राणे, शिशिर शिंदे, बाळा नांदगावकर शिवसेनेतून बाहेर
१२ - २०१४ मध्ये भाजपपुढे न झुकता, शिवसेनेने १५१ चे मिशन आरंभलं
१३ - २०१९ मध्ये शिवसेनेला पुन्हा सत्तासिंहासनावर बसविलं