कृष्णात पाटील, मुंबई : निवडणूक काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावल्याचं समोर आलं आहे. निवडणूक कामावर असल्याचे निमित्त पुढं करून पालिका अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यानं अनेकांनी अनधिकृत बांधकामांचा सपाटाच शहरात लावल्याचे आकडेवारीवरून समोर आले.
लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबईत बेकायदा बांधकाम करणाऱ्या माफियांना रान मोकळं झाल्यासारखी स्थिती आहे. गेल्या दोन महिन्यांत मुंबईत शेकडो बेकायदा बांधकामं उभी राहिली आहेत. फेब्रुवारी महिन्यात अनधिकृत बांधकामाच्या ३ हजार ६२१ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी १ हजार ७१८ तक्रारींचं निवारण झालं. मार्च महिन्यात ४ हजार १४६ तक्रारी दाखल झाल्या आणि त्यापैकी १हजार २७८ तक्रारींचं निवारण झालं.
एप्रिल महिन्यात ४ हजार १०९ तक्रारी आल्या त्यातल्या केवळ ४४१ तक्रारींचं निवारण झालं GFXOUT चेंबूरच्या गांधी मार्केटमध्ये दोन महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले दुकानाचे गाळे पुन्हा उभारण्याचं काम सुरू आहे. हिच तऱ्हा घाटकोपरच्या असल्फा व्हिलेजची.... तिथं यापूर्वी दोनदा कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा बांधकाम सुरू झालं.
आचारसंहिता लागू असली तरी निवडणुकीचं काम मात्र संपलं आहे. असं असताना बेकायदा बांधकामांवर पुन्हा हातोडा पडणं गरजेचं होतं. पण अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून माफियांसाठी रान मोकळं ठेवलंय की काय अशी स्थिती मुंबईमध्ये निर्माण झाली आहे.