विधानपरिषद उपसभापती निवडणुकीत युतीकडून नीलम गोऱ्हे?

युतीचं मनोमिलन झाल्यानंतर शिवसेना भाजपसाठी पहिली राजकीय लढाई याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Updated: Feb 24, 2019, 06:24 PM IST
विधानपरिषद उपसभापती निवडणुकीत युतीकडून नीलम गोऱ्हे? title=

मुंबई : युतीचं मनोमिलन झाल्यानंतर शिवसेना भाजपसाठी पहिली राजकीय लढाई याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे या युतीच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे. याआधी काँग्रेसकडे असलेले विधानपरिषदचे उपसभापतीपद सध्या रिक्त आहे. त्यासाठी या अधिवेशनात निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे.

सध्या सत्ताधारी भाजप शिवसेनेकडे संख्याबळ जास्त आहे. भाजपाचे २२, शिवसेनेचे १२, एक राष्ट्रीय समाज पक्ष याशिवाय ५ अपक्ष आमदार असल्याचा दावा सत्ताधारी यांनी केला आहे. तेव्हा सत्ताधारी यांचे ४० संख्याबळ होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी १७, कपिल पाटील यांचा लोकभारती, जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष, जोगेंद्र कवाडे पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि कोकण शिक्षक मतदार संघाचे बाळाराम पाटील अपक्ष असे एकूण ३८ चे संख्याबळ विरोधी पक्षाकडे आहे.

यामुळे उपसभापती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी यांचा उमेदवार निवडणून येणार हे स्पष्ट आहे. या जागेवर शिवसेनेच्या नीलम गो-हे यांच्या नावाची चर्चा आहे. तर काँग्रेस आघाडीकडून अजून कोणतेच नाव पुढे आलेले नाही.