काम तुमच्याच पद्धतीने होऊ द्या; विनायक मेटेंकडून शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे.

Updated: Feb 5, 2020, 04:46 PM IST
काम तुमच्याच पद्धतीने होऊ द्या; विनायक मेटेंकडून शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा title=

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे सर्वेसर्वा विनायक मेटे यांनी बुधवारी शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित स्मारकासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. विनायक मेटे २०१५ पासून समितीच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. मात्र, सरकार बदलल्यामुळे त्यांनी समितीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून ही माहिती दिली. आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसचे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख व समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो. भविष्यात माझी काही मदत लागल्यास सहकार्यासाठी मी सदैव तयार असेन, असे मेटे यांनी पत्रात म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी शिवस्मारकाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. महाराजांच्या स्मारकाच्या कामात घोटाळा हे निंदाजनक असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. 

मात्र, सरकारला चौकशीच्या नावाखाली स्मारकाचे बांधकाम रेंगाळत ठेवायचे आहे, असा पलटवार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एवढेच नव्हे तर सरकारला या प्रकल्पाची चौकशी करायची असेल तर ती रेंगाळत न ठेवता तातडीने करा, असे आव्हानही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिले होते.