कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : छडी लागे छमछम... विद्या येई घमघम... हा काळ आता लोटला असला तरी अजूनही अशा काही प्रवृत्ती अधूनमधून डोकं वर काढत असल्याचं कोल्हापूर जिल्ह्यातल्या घटनेनं समोर आलं आहे. अशाच कठोर शारीरिक शिक्षेमुळे आजारी असलेल्या कोल्हापूरमधल्या विद्यार्थिनीवर मुंबईत उपचार सुरु आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या विद्यार्थिनीचे थरथरणारे आणि लटपटणारे पाय पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. कसलेला पैलवानही ५०० उठाबशा मारू शकणार नाही. पण, कोल्हापुरातल्या शिक्षिकेनं या विद्यार्थिनीला ती शिक्षा दिली. त्यामुळे या मुलीला प्रचंड शारिरिक त्रास झालाच, शिवाय तिच्या मनावरही मोठा आघात झालाय.
कोल्हापुरातून मुंबईतल्या केईएम रूग्णालयात दाखल केलेल्या या मुलीवर इतर उपचारांबरोबरच मानसिक उभारीकरता तिचं समुपदेशनही केलं जातंय.
कठोर शिक्षा केल्याने शिस्तीऐवजी मुलांना शाळा, शिक्षक, अभ्यासाबात तिटकारा निर्माण होऊ शकतो. म्हणून शारिरिक शिक्षेऐवजी, मुलांना त्यांची चूक समजवून देणं गरजेचं असल्याचं मतं मानसोपचार तज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या विद्यार्थिनीची केईएममध्ये येऊन विचारपूस केली. ती शिकत असलेल्या शाळेची तिला धास्ती वाटू नये यासाठी तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं.
एकंदरच मुलांच्या मनामध्ये शिक्षकांविषयी धाक नव्हे तर प्रेम कसं निर्माण होईल, या दृष्टीनं प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे. तेव्हाच शिक्षण आनंददायी होईल.