प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : विरारमध्ये राहणार्या 48 वर्षीय शिक्षकाच्या हाताची नस कापून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या हत्या प्रकरणात अर्नाळा सागरी पोलिसांनी 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मालाडमधल्या एका कॉलेजच्या 48 वर्षीय प्राध्यापकाची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला विरार इथल्या त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत प्राध्यापकाची गेल्याच आठवड्यात पदोन्नती झाली होती. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र तपासानंतर ही हत्या असल्याचे उघड झालं आहे.
डॉ.नागेश सेनिगारपू विरार पश्चिम येथील एका घरामध्ये एकटेच राहत होते. सोमवारी जेव्हा त्यांचा फोन आला तेव्हा त्यांचा भाऊ फ्लॅटवर पोहोचला आणि त्याने पाहिले की, बेडरूममध्ये नागेश सेनिगारपू यांचा मृतदेह पडलेला होता. नागेश सेनिगारपू यांच्या दोन्ही हाताच्या नसा कापल्या होत्या. अर्नाळा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. कुटुंबीयांनाही या प्रकरणात कोणत्याही गैरप्रकाराचा संशय आला नाही अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंग परदेशी यांनी दिली.
नागेश सेनिगारपू यांच्या एका मनगटावर खोल जखम होती आणि दुसऱ्यावरची जखम खोल नसल्यामुळे ती आत्महत्या मानली जाऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात ही एक प्रकारची आत्महत्या वाटत असली तरी सेनिगारपू यांचा फोन घटनास्थळावरुन गायब असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यानंतर सेनिगारपूचे सीडीआर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती 21 जानेवारीच्या संध्याकाळी 7.30 च्या सुमारास एक व्यक्ती इमारतीत शिरताना दिसली. काही तासांनंतर तो तिथून निघून गेला. पोलिसांनी त्या व्यक्तीबाबत इमारतीमधल्या लोकांकडे चौकशी केली असता त्यांना या व्यक्तीची ओळख पटवता आली नाही. त्यानंतर पोलिसांनी सीडीआर तपासले असता त्यांना सेनिगारापू हा अल्फरान चांद उस्मान खान नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे समोर आलं. पोलिसांनी सापळा रचून अल्फरन खानला मंगळवारी ओशिवरा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर खानने चौकशीत सेनिगारापूच्या खुनाची कबुली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फरन खान हा चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कामाच्या शोधात होता आणि त्याने मसाज थेरपीची नोकरीही केली होती. एका वर्षापूर्वी तो सेनिगारपूला भेटला आणि त्यांची मैत्री झाली. सेनिगारपूला वेगवेगळ्या ठिकाणी भेटल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रविवारी अल्फरन खान नागेशच्या घरी गेला होता. त्यावेळी नागेशने अल्फरन खानशी शारिरीक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रागाच्या भरात अल्फरन खानने नागेश याच्या हाताच्या नसा कापून हत्या केली. आम्ही आरोपीला अटक केली असून त्याला 28 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.