...तर Vodafone Idea कंपनीला टाळे ठोकावे लागेल- बिर्ला

सरकारला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतील.

Updated: Dec 6, 2019, 05:16 PM IST
...तर Vodafone Idea कंपनीला टाळे ठोकावे लागेल-  बिर्ला

नवी दिल्ली: केंद्र सरकारने समायोजित एकूण महसुली लाभ (एजीआर) प्रकरणात लवकर दिलासा दिला नाही तर Vodafone Idea कंपनीला टाळे ठोकावे लागेल, असा इशारा आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला. ते 'हिंदुस्तान टाईम्स'च्या लीडरशीप समीटमध्ये बोलत होते. यावेळी बिर्ला यांनी सध्याच्या मंदीच्या काळात टेलिकॉम क्षेत्राला सरकारकडून दिलासा मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. 

सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला नाहीतर Vodafone Idea कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला ५३ हजार कोटींचे शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे. मात्र, कोणतीही टेलिकॉम कंपनी तीन महिन्यांच्या कालावधीत एजीआर रक्कमेची भरपाई करण्याच्या स्थितीत नाही, असे बिर्ला यांनी सांगितले. 

व्होडाफोन आयडिया समूहात आदित्य बिर्ला समूहाची २७.६६ टक्के हिस्सेदारी आहे. तर व्होडफोनचा वाटा ४४.३९ टक्के इतका आहे. यापूर्वी व्होडाफोनचे सीईओ निक रीड यांनीही सरकारच्या धोरणाविषयी चिंता व्यक्त केली होती. कंपनीसाठी भारतात व्यवसाय करणे अवघड झाल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर आता कुमार मंगलम बिर्लाही यांनीही तोच सूर आळवला आहे. बिर्ला यांच्या या विधानेच पडसाद भांडवली बाजारातही पाहायला मिळाले.  

यावेळी कुमार मंगलम बिर्ला यांनी जीएसटी दरातील कपातीचेही समर्थन केले. सरकारला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतील. जर जीएसटी १५ टक्क्यांपेक्षा कमी झाला तर टेलिकॉम क्षेत्राला फार मोठी मदत होईल, असे बिर्ला यांनी सांगितले.