आधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

Updated: Dec 3, 2019, 08:55 PM IST
आधीच्या कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pic Courtesy: ANI

मुंबई : आम्ही कोणत्याही विकासकामांना स्थगिती दिलेली नाही. तसेच रद्द केलेली नाहीत. उलट ही कामे गतीने कशी पूर्ण होतील, याकडे आम्ही लक्ष देत आहोत. सहाजिकच आहे त्यात प्राधान्यक्रम ठरवून पुढची वाटचाल होईल. राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांची विकास कामे थांबवणार, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी बुलेट ट्रेनबाबत स्पष्टीकरण दिले. बुलेट ट्रेनचा आढावा घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री म्हणालेत.

राज्यातील आधीच्या विकास कामांचा आढावा घेण्यात येईल. कोणत्या विकासकामांना प्राधान्य द्यायचा याचा विचार केला जाईल. असे असले तरी विकास कामे थांबवणार नाहीत, असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून ही कामे वेळेत पूर्ण करावीत, जेणे करून सामान्य जनतेला त्याचा वेळीच लाभ घेता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कुठलाही विकास प्रकल्प राबविताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. प्रशासनामार्फत तळमळीने काम केले जाते.मात्र कामाची प्रगती आणि निधी याचा ताळमेळ घालणेही आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मेट्रोसाठी ठिकठिकाणी आवश्यक असणाऱ्या कारशेडच्या उभारणीबाबत स्थानिकांना विश्वासात घेऊन मार्ग काढण्यात येईल. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात देखील समृद्धी आली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी मेट्रो, मुंबई, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल या कामांबद्दल सादरीकरण करण्यात आले.