Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आता थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. किमान तापमानात घट झाल्यामुळं इथं हिवाळा खऱ्या अर्थानं सुरु झाला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत असल्याचं निदर्शनास येत आहे. पुढील 24 तासांमध्ये हवामानाची अशीच स्थिती कायम राहणार असून, उर्वरित आठवड्यातही थंडी कायम राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या अरबी समुद्र्याच्या आग्नेयेला मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यानजीक चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं आकाश निरभ्र असून पहाटेच्या वेळी गारठा जाणवत असला तरीही दुपारच्या वेळी जाणवणारा उकाडा मात्र काही कमी झालेला नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरीही याशीतलहरींवर दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा परिणाम होत आहे. परिणामी तूर्तास मुंबईकरांना मात्र हिवाळ्याची आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. असं असतानाही पहाटेच्या वेळी शहरात गारठा जाणवेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. थोडक्यात पुढचे दोन दिवस तापमानातील चढ- उतार पाहता हवामानात फारसे बदल होणार नाहीत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
देशाच्या दक्षिणेला असणाऱ्या तामिळनाडू, केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, आंध्र प्रदेश या राज्यांसह आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. तर, उत्तरेकडे मध्य प्रदेशापासून पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सुरु असल्यामुळं सध्या इथं वाहतुकीवर परिणाम झाले आहेत. असं असलं तरीही या राज्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मात्र हे वातावरण कमाल अनुभव देऊन जात आहे. तेव्हा हमानाचा एकंदर अंदाज पाहता तुम्ही एखाद्या हिवाळी सहलीचा बेत आखत असाल तर, हे वातावरण कमाल आहे.