देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : रेल्वे प्लॅटफॉर्मवर हमखास दिसणारे व्हिलर बुकस्टॉलचं रूप बदलतं आहे. रेल्वेच्या वाचन संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या स्टॉलना काळानुसार बदलणं भाग आहे. मात्र त्यामुळे एक ऐतिहासिक ठेवा विस्मृतीत जाणार आहे. बुक स्टॉलचं 'मल्टिपर्पज स्टोअर'मध्ये रुपांतर होणार आहे.
ई-बुकमुळे पुस्तकं, मासिकांची मागणी घटली
वर्तमानपत्र, पुस्तकं, मासिकं, नकाशे या गोष्टी मिळणारे 'व्हिलर'चे स्टॉल ही रेल्वे प्लॅटफॉर्मची खास ओळख. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ई-बुककडे वाचकांचा ओढा वाढलाय. वर्तमानपत्र, मासिकंही ऑनलाईन उपलब्ध आहेत. नकाशेही मोबाईलवरच दिसतात. त्यामुळे व्हिलर स्टॉलधारकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय. त्यामुळेच आता या स्टॉलवर इतर वस्तूंची विक्री करण्यास मान्यता देण्यात आलीये. 30 टक्के पुस्तकं आणि 70 टक्के अन्य वस्तू ठेवता येणार आहेत.
1877 साली देशभरातील स्थानकांवर 'व्हिलर'चे स्टॉल सुरू करण्यात आले. प्रवाशांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, प्रवासात मनोरंजनाची साधनं असावीत, यासाठी ब्रिटिशांनी हे स्टॉल सुरू केले खरे मात्र काळानुसार त्याची गरज कमी-कमी होत गेली.
लॉकडाऊनच्या काळात अर्थातच स्टॉल पूर्ण बंद होते. अनलॉकनंतरही व्यवसाय फारसा वाढलेला नाही. त्यामुळेच इतर वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्याची मागणी स्टॉलधारकांनी केली होती. अर्थात रेल्वे बोर्डाकडून मान्यता असलेल्या गोष्टीच या स्टॉलवर विक्रीला ठेवता येणार आहेत.
लवकरच देशभरातील व्हिलरचे स्टॉल आपलं रुप बदलतील. रेल्वेतील वाचनसंस्कृतीचं नातं सांगणारा एक ठेवा काळाच्या पडद्याआड जाईल.