दीपक भातुसे, मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नव्या विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यासाठी काँग्रेसची येत्या सोमवारी मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार असून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेतील पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या नावाची चर्चा आहे. या तिघांच्या नावापैकी एकाच्या नावावर सोमवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. येत्या १७ जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.
या अधिवेशनात नवा विरोधी पक्षनेता पहायला मिळेल. मात्र विधानसभेच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याने नव्या विरोधी पक्षनेत्याला केवळ चार महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर नगरची लोकसभा निवडणूक भाजपाकडून लढवली आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या निवडणुकीत आपल्या मुलाचा पर्यायाने भाजपाचा प्रचार केला. त्याचप्रमाणे ते काँग्रेसच्या प्रचारासाठी बाहेरही पडले नाहीत. मुलाचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्यानंतर विखे-पाटील यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसने हा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप हा राजीनामा मंजूरीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला नाही. येत्या दोन दिवसात हा राजीनामा मंजूरीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जाईल अशी शक्यता आहे. त्यानंतर नवा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी सोमवारी काँग्रेसची मुंबईत बैठक होत आहे.