भाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?

शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2019, 07:04 PM IST
भाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही? title=

मुंबई : शिवसेनेने आपल्या विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली आहे. एका खासदाराला डच्चू दिला आहे. या खासदाराबाबत नाराजी असल्याने उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले जात आहे. त्याचवेळी भाजपकडून मागून घेतलेल्या पालघर लोकसभा जागेवर शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे याची चर्चा सुरु झाली आहे. पालघरमधून दिवंगत वनगा यांच्या मुलाला उमेदवारी देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत झाली होती. यावेळी शिवसेनेने जोरदार लढत दिली होती. पराभवानंतर उद्धव यांची मतदारांच्या आभारासाठी सभा झाली त्यावेळी पुढेच उमेदवार हे श्रीनिवास वनगाच असतील असे जाहीर केले. मात्र, पहिल्या यादीत पालघरची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तसेच उस्मानाबाद मतदार संघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना डच्चू देण्यात आला असून या जागेवरून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेने प्रलंबित राहिलेली पालघरची जागा भारतीय जनता पक्षाकडून मागून घेतली आहे. या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी इथून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी मिळेल का याची उत्सुकता आहे.. याबरोबरच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे साताऱ्याच्या जागेवरून भाजपतर्फे लढण्याच्या तयारीत होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे आल्याने पाटील यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच जागेवरून इच्छूक असललेले पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. या भेटीनंतर पाटील हे शिवसेनेत जाणार अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

पालघरची जागा ही भाजपने आधीच्या लोकसभा निवडणुकीत जिंकली होती. तसेच पोटनिवडणुकीतही बाजी मारली होती. तसेच या ठिकाणी बविआ निवडणूक रिंगणात उतरणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस बविआच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन विकास आघाडीही पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे निवडणूक रिंगणात युती विरोधात सर्व पक्ष असे चित्र दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका नको, याची चाचपणी सुरु आहे.  तर साताऱ्यात राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार उदयनराजे भोसले आहेत. ते विद्यमान खासदार आहेत. त्यांच्यासमोर आता शिवसेनेचा उमेदवार  असणार आहे. कारण ही जागा शिवसेनेला गेली आहे. या ठिकाणाहून भाजपने निवडणुकीची तयारी केली होती. राष्ट्रवादीचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीला दे धक्का दिला होता. मात्र, ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील यांची कोंडी झाली आहे. तसेच पालघरमध्ये शिवसेनेला यश मिळेल की नाही, याचीही भीती आहे. त्यामुळे दोन्ही जागेवर उमेदवारांची घोषणा झालेली नाही. दरम्यान, पालघरची जागा भाजपकडे येण्याची शक्यता आहे. युती झाल्यामुळे एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे. 
 
शिवसेनेने लोकसभेच्या २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीतील २१ उमेदवारांपैकी १७ विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.. मात्र सातारा आणि पालघर या दोन जागांबाबत शिवसेनेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. येत्या २४ तारखेला कोल्हापूर येथे आयोजित युतीच्या महामेळाव्यात या दोन जागांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तशी माहिती ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी दिली.

दरम्यान, शिवसेनेने जाहीर केलेल्या २१ लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन कीर्तीकर, उत्तर मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, ठाण्यातून राजन विचारे, औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे, अमरावतीतून आनंदराव अडसूळ आणि शिरूर मतदार संघातून शिवाजीराव अढळराव पाटील यांना तर हिंगोली मतदार संघातून हेमंत पाटील यांना संधी देण्यात आली आहे.