राष्ट्रवादीत अजितदादांची आधीची इमेज पुन्हा निर्माण होईल का?

अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत आधी सारखे सक्रीय होणार का ?

Updated: Nov 27, 2019, 01:18 PM IST
राष्ट्रवादीत अजितदादांची आधीची इमेज पुन्हा निर्माण होईल का?

मुंबई : सगळ्यांच्याच नजरा आज विधानसभेतल्या शपथविधीबरोबरच खिळून होत्या त्या अजित पवारांच्या येण्याकडे...दादांनी विधानभवनाजवळ येताच योगायोग म्हणावा तर जयंत पाटील आणि अजित दादांच्या गाड्या एकमागोमाग आल्या. जयंत पाटील दादांना पाहून थांबलेही. मात्र इथेही अजित दादांनी जयंत पाटलांना पाहून डायलॉगबाजी केली.

तिथून पुढे अजित दादा, जयंत पाटील, आणि धनंजय मुंडे यांनी विधानभवनाच्या गेट मधून एन्ट्री करताच. सुप्रिया सुळेंनी त्यांचं स्वागत केलं. सुप्रियाने अजित दादांची गळाभेट घेतली. मात्र स्वागत करताना अनेकांची गळाभेट घेणाऱ्या सुप्रियाने अजित दादांची गळाभेट मात्र घेतली नाही तर अजित दादांनीच आपल्या बहिणीला जवळ घेतलं.

पुढे आल्यावर पत्रकारांनी अजित पवारांवर अनेक प्रश्नांचा भडीमार केला मात्र एका प्रश्नावर चिडत मी कुठे राष्ट्रवादीतून बाहेर पडलो असं अजितदादा म्हणाले.

अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पुन्हा राष्ट्रवादीत आल्याच चित्र असलं तरी प्रत्येकाच्या मनात अजित दादांची आधीची   इमेज पुन्हा निर्माण होईल का हा प्रश्नच आहे.

एरवी संसद प्रांगणात दिसणाऱ्या सुप्रिया सुळे सकाळी सकाळी विधानभवनात दिसल्या. नेहमीच स्मित हास्य चेहऱ्यावर, पण डोळ्यात एका कडेला दिसत होता भावासाठीचा हळवेपणा, राजकारणानं ४ दिवस भाऊ दुरावला ते दु:ख सुप्रियाच्या चेहऱ्यावर दिसलं. प्रतिक्रिया देताना ४ दिवसापूर्वीच्या सुप्रिया आज खुलल्या. 

शपथविधीसाठी येणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांना मिठी मारणाऱ्या सुप्रियांची, अजित पवार आले त्यावेळी थोडी चलबिचल झालीच असणार. भावा बहिणीनं एकमेकांना मिठीत घेतलं पण मनातला एक कोपरा दुखराच राहिला. मिठीत घेताना चेहरे मात्र विरुद्ध दिशेला दिसले. कालांतरानं जखमेचा प्रभाव कमी होईल कदाचित पण, ऐंशीव्या वर्षी बाबांना दादानं दुखावलं ही सल कायम राहील, येवढं मात्र नक्की.