सर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबईमध्ये लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Updated: Jun 17, 2020, 05:39 PM IST
सर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार? title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबईमध्ये लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. पण २२ मार्चपासून ज्यांचे रेल्वे पासचे दिवस वाया गेले आहेत ते त्यांना भरून मिळणार आहेत. सध्यातरी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू होईल तेव्हा त्यांनाही वाया गेलेले दिवस भरून मिळण्याची शक्यता आहे. अद्याप सर्वसामान्य प्रवाशांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच UTS वरून पास काढणाऱ्यांनाही त्यांच्या फुकट गेलेल्या पासचे दिवस भरून मिळण्याची शक्यता आहे. 

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेच्या पासवर शिक्का मारून फुकट गेलेले दिवस परत भरून दिले जात असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. पण सध्यातरी ही सुविधा फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पासवरचे दिवस भरून घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी करु नये, असं आवाहनही करण्यात येत आहे.