शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत मोठा निर्णय 

Updated: Nov 29, 2021, 07:28 AM IST
शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार? आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

मुंबई : कोरोनाचा नवा खतरनाक व्हेरिएंट ओमिक्रॉनचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशावर कोरोनाची टांगती तलवार आहे. असं असताना राज्यात शाळा सुरू होणार की नाही? हा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांना पडला आहे. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

राज्यात सध्या ओमिक्रॉनचे रुग्ण नाहीत, त्यामुळे ठरल्याप्रमाणे शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळांमध्ये 1 डिसेंबरपासून घंटा वाजणार आहे. 

राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंट आढळल्याने शाळा सुरू कराव्यात का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती.

सध्या ओमिक्रॉनची राज्याला भीती नाही आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे 1 डिसेंबरपासूनच शाळा सुरू होणार असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी कोरोना नियमांचं पालन करण्याचंही आवाहन केलं आहे. 

मुख्यमंत्र्यांची ओमिक्रॉनबाबत महत्वाची बैठक  

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या खतरनाक व्हेरियंटला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता, तातडीनं कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन, मुख्यमंत्र्यांनी रविवारी तातडीची बैठक बोलावली होती.

पुन्हा संसर्ग वाढू नये, म्हणून काळजी घ्या.. लॉकडाऊन येऊ द्यायचा नाही, या निर्धारानं आरोग्याचे नियम पाळा, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलं आहे.