मुंबई : मॉल्स, होटेल्सच्या महिला वॉशरुममध्ये कॅमेरा आढळल्याच्या घटना याआधी समोर आल्या होत्या. पण आता चक्क चर्चच्या महिला वॉशरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
माहिमधील सेंट मायकल चर्चमधील हा प्रकार समोर आला आहे. आर्चबिशप कार्डिनल ओस्वाल्ड गेसियस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याबाबत चर्चला पत्र पाठवून विचारणा केल्याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.
पोर्तुगीजांनी १५३४ मध्ये माहिम येथे हे चर्च बांधण्यात आले होते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी चर्चमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. पण नको तिथे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जर बाथरूममध्येही चोरी होऊ शकते असे वाटत असेल तर मग वॉशरूमच्या ५० मीटर परिसरातही सुरक्षा रक्षक तैनात करायला हवेत, असं ही डिसूजा यांनी पत्रातून म्हटले आहे.
कॉरिडोरमध्ये कॅमेरे लावणे योग्यच आहे. पण वॉशरूममध्ये कॅमेरे लावणे तसंच वॉशरूममध्ये असताना कोणीतरी तुम्हाला पाहताहेत हेच खूप धक्कादायक असल्याचे चर्चमध्ये नियमितपणे प्रार्थनेसाठी येणाऱ्या बी.डि. डिसूजा यांनी 'मुंबई मिरर'ला सांगितले.
'टॉयलेटच्या बेसिनजवळ हे कॅमेरे लावले आहेत. केवळ महिलांच्या सुरक्षेसाठी हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याबाबत अद्याप कुणी तक्रार केलेली नाही. जर याबाबत कोणीची काही तक्रार असेल तर त्यांचे समाधान केलं जाईल' असा खुलासा सेंट मायकल चर्चचे पादरी सिमॉन बोगर्स यांनी केला आहे.