झी २४ तास इम्पॅक्ट: २६ खासगी रुग्णालयांतील १३४ जादा बिलांच्या तक्रारींचा निपटारा

झी २४ तासच्या या मोहिमेनंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे.

Updated: Jun 21, 2020, 09:00 PM IST
झी २४ तास इम्पॅक्ट: २६ खासगी रुग्णालयांतील १३४ जादा बिलांच्या तक्रारींचा निपटारा title=
संग्रहित फोटो

मुंबई : कोरोना व्हायरस उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बील आकारणी होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करताना हॉस्पिटलकडून लाखो रुपयांची बिलं घेतली जात होती. हॉस्पिटलच्या या लुटीविरोधात झी २४ तासने हॉस्पिटलचा पंचनामा ही मोहीम हाती घेतली होती. खासगी रुग्णालयांनी केलेल्या लूटबाबतच्या, सर्वसामन्यांच्या व्यस्था मांडल्या होत्या. झी २४ तासच्या या मोहिमेनंतर मुंबई महापालिकेने ही कारवाई केली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने विविध खासगी रुग्णालयांसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक केली. तेव्हापासून आजपर्यंत २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारींचा निपटारा होवून एकूण २३ लाख ४२ हजार रुपयांनी देयकांची रक्कम कमी झाली आहे. सुमारे १५ टक्क्यांनी देयकांची रक्कम कमी होवून रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांना अधिकाधिक परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, म्हणून राज्य शासनाच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महानगरपालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचं रुग्णांना वितरण करण्याचं समन्वयन देखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. या ८० टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून, शासनाने २१ मे २०२० रोजीच्या आदेशान्वये निर्धारित केलेल्या दरानुसार संबंधित रुग्णालयांनी शुल्क आकारणी करणं गरजेचं आहे. असं असलं तरी खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करत असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. यामुळे महानगरपालिका प्रशासनाने, खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी २ अधिकाऱ्यांची नियुक्ती ही खासगी रुग्णालयांसाठी केली आहे. 

एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करायची असल्यास त्यासाठीचा पर्याय देखील महानगरपालिकेने उपलब्ध करून दिला आहे. यासाठी संबंधित खासगी रुग्णालयासाठी ज्या सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिकाऱ्याकडे ईमेलद्वारे थेट तक्रार नोंदवता येते. खासगी रुग्णालयामधील खाटांचं वितरण प्रभावीपणे होण्यासह वैद्यकीय सेवा सुविधा रुग्णांना अधिक परिणामकारकपणे मिळाव्यात; याकरिता सुयोग्य समन्वय साधण्यासाठी या ५ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती शासनाने केली आहे.

खासगी रुग्णालयांच्या आकारणीसंदर्भात ही कार्यवाही केल्यापासून आतापर्यंत २६ रुग्णालयांतील १३४ तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. या सर्व तक्रारींमधील मूळ आकारणीची एकूण रक्कम ही १ कोटी ६१ लाख ८८ हजार ८१९ रुपये होती. या देयकांचे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण केल्यानंतर वास्तविक रक्कम ही १ कोटी ३८ लाख ४६ हजार ७०५ रुपयांपर्यंत कमी झाली. म्हणजेच एकूण २३ लाख ४२ हजार ११४ रुपयांनी आकारणीची रक्कम कमी झाली. 

तक्रारी मिळाल्यापासून एका आठवड्याच्या आत त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचे देखील लेखापरीक्षण करण्याची कार्यवाही सुरु असून तातडीने त्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, महानगरपालिकेकडे प्राप्त होत असलेल्या अशा तक्रारींपैकी अंदाजे ४० टक्के तक्रारी या शासनाने खासगी रुग्णालयांचे दर निश्चितीबाबत केलेल्या आदेशापूर्वीच्या आहेत.