www.24taas.com, मुंबई
अभिषेक-ऐश्वर्याला कशामुळे वेदना झाल्या. या वेदना प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वत:चे कान का टोचून घेतले. त्यानंतर अभिषेकने आराध्याला का घट्ट मिठी मारली. कारण काय होते..हे प्रश्न विचारण्याचे कारण काय, असा प्रश्न पडला असेल ना. मात्र, असाच एक हळूवार प्रसंग अभिषेक-ऐश्वर्यावर आला. निमित्त होतं, बेटी आराध्याच्या कान टोचनीचे.
आपल्या मुलीचे कान टोचताना तिला होणा-या वेदना आपल्यालाही जाणवाव्यात म्हणून या जोडीनं चक्क स्वतःचेकान टोचून घेऊन आपल्या लेकीवरचं हळवं प्रेमच व्यक्त केलंय. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात, अभि-अॅशची ' बेटी बी ' आराध्या जूनमध्ये सहा महिन्यांची झाली, तेव्हा प्रथेप्रमाणे तिचे कान टोचून घेण्याचं बच्चन कुटुंबात ठरलं. पण, कान टोचताना आराध्याला किती दुखेल, या नुसत्या कल्पनेनंच अभि-अॅश हळहळले.
आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणा-या या आई-बाबांना, तिला होणा-या वेदना सहन होणार नव्हत्या. शेवटी, स्वतःचेही कान टोचून घ्यायचे आणि आराध्याचं दुखणं ' वाटून ' घेण्याचं ठरवलं आणि ते कृतीतही उतरवलं. गेल्या आठवड्यात, आराध्या आणि अभिषेकनं पहिल्यांदा, तर ऐश्वर्यानं दुस-यांदा आपले कान टोचून घेतले.
ऐश्वर्याची आई, आराध्याची आजी वृंदा राय यांनी हा कान टोचण्याचा कार्यक्रम आखला होता. हा विधी आटोपून घरी गेल्यावर अभिषेकनं आराध्याला घट्ट मिठी मारली. बाप-बेटीचं हे प्रेम पाहण्यासारखं होतं, असं अॅशच्या निकटवर्तीयानं सांगितलं. आता अभिषेक आणि आराध्याच्या कानात सोन्याचे डुल शोभून दिसताहेत, तर अॅशच्या कानात हिरा चमकतोय.