पानिपत युद्धाचं यंदाचं २५०वं वर्ष आहे. या निमित्तानं पुण्यातल्या युवा रंगकर्मींनी रणांगण पुन्हा एकदा रंगमंचावर आणायचं ठरवलंय. दिग्पाल लांजेकर या नाट्यकमीर्नं ही धुरा उचलली असून नव्यानं रंगमंचावर येत असलेल्या 'रणांगण'चं तो दिग्दर्शन करतो आहे.
'पानिपत युद्धाला या वर्षी २५० वर्ष पूर्ण होणं ही खूप महत्त्वाची घटना आहे. त्यामुळे रणांगणचं पुनरुज्जीवन करणं मला खूप आवश्यक वाटलं, असे दिग्पालने सांगितले. सवाई आणि श्री गणंजय या दोन संस्थांच्या मदतीनं आम्ही रणांगण पुन्हा एकदा रंगमंचावर आणतो आहे. नव्यानं येत असलेलं रणांगण प्रायोगिक पद्धतीनं सादर होणार आहे. यापूर्वी झालेल्या नाटकाची नव्या नाटकाशी तुलने बद्दल दिग्पाल म्हणतो 'तुलना स्वाभाविक आहे. मी लहान असताना शनिवारवाड्यावर रणांगण पाहिलं होतं. मी वामन केंद्रे यांचा फॅन आहे. आत्ता थोडं दडपण आहे आणि आत्मविश्वासही. आत्मविश्वास अशासाठी; कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बेतलेल्या 'अवध्य' या नाटकाचा प्रयोग आम्ही अंदमानात जाऊन केला होता.'
कादंबरी वाचताना जो परिणाम साध्य होतो, तोच परिणाम नाटकातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नाटकाचं नाव 'पानिपताचं रणांगण' असणार आहे. ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी हे नाव सुचवलं होतं. विश्वास पाटील यांनी आम्हाला नाटक देताना हे नाव देण्याची सूचना केली होती. नव्या नाटकात सदाशिवराव भाऊच्या भूमिकेत योगेश सोमण तसंच ज्ञानेश वाडेकर, रोहन मंकणी, शैलेश खोत यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.