www.24taas.com, अहमदाबाद
कोलावरी डी या गाण्याने देशातच नव्हे तर जगभरात एकच धूम उडवली दिली. युट्युबवर डाऊनलोड्सचा नवा विक्रम कोलावरी डीने प्रस्थापित करत इतिहास घडवला. कोलावरी डीने आजच्या तरुणाईला बेधुंद करताना त्याची सादही इंटरनेट या आजच्या माध्यमातून घातली. आणि त्यामुळेच अगदी अल्पावधीतच त्याने लोकप्रियतेचे शिखर सर केलं. आता कोलावरी डीचा गायक धनुष वायरल मार्केटिंगचे धडे अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना देणार आहे.
कोलावरी डीमुळे घराघरात पोहचलेला धनुष आज आयआयएम अहमदाबादमध्ये लेक्चरच्या माध्यमातून गाण्याची यशकथा सांगणार आहे. धनुष आणि संगीत दिग्दर्शक अनिरुध्द रवीचंदर आयआयए अहमदाबादच्या कंटेमपररी फिल्म इंडस्ट्रीच्या १३० विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देणार आहे. या कोर्सचे कोऑरडीनेटर भारतन कंडास्वामी म्हणाले की कोलावरी डीची यशकथा तसंच वायरल मार्केटिंग आणि सोशल मिडीया यावर धनुष आणि अनिरुध्द रवीचंदर लेक्चर देणार आहेत.
रजनीकांतचा जावई असलेल्या धनुषचे कोलावरी डी या गाण्याच्या १६ नोव्हेंबर रोजी डिजीटल रिलीजनंतर देशातील तरुणाईला अगदी कमी वेळात वेडं करुन सोडलं. आतापर्यंत ऑनलाईन १० दशलक्ष डाऊनलोडसचा विक्रम या गाण्याने नोंदवला आहे. आता या गाण्यासाठी आखलेली व्युहरचना कंपन्यांच्या मार्केटिंगसाठी कशी उपयुक्त ठरेल यावर बोलणार असल्याचं धनुषने सांगितलं.