आमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट

स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.

Updated: May 8, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमिर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमिर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.

 

सुपरस्टार्स ज्या प्रकारे आपल्या सुंदर चेहऱ्यांचा वापर करून मुद्यांचं भांडवल करतात आणि त्यांची भारतभर असणारी क्रेझ पाहून तसलिमा नसरीन बुचकळ्यात पडल्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना जेवढा प्रतिसाद मिळत नाही, तेवढा प्रतिसाद एकट्या अमिर खानच्या उपस्थितीमुळे एकाद्या  मुद्याला कसा काय मिलतो मिळतो, याचा उलगडा त्यांना होत नाहीये.

 

आपल्याला पडलेलं हे कोडं तसलिमा नसरीन यांनी ट्विटरवर मांडलं आहे. “आतापासून फिल्मस्टार्सनीच टीव्हीवर सामाजिक प्रश्न मांडायला सुरूवात करावी. सगळेजण त्यांचंच ऐकतात. ते मानवाधिकारासाठी लढणाऱ्या सदस्य़ांचं कधीच ऐकत नाहीत.” अशा वक्रोक्तीपूर्ण शब्दांत नसरीन यांनी आपली व्यथा मांडली आहे.

 

“कित्येक महिला संघटना गेल्या कित्येक वर्षांपासून स्त्रीभ्रूण हत्त्येवर आणि त्यांच्या गंभीर परिणांमांबद्दल समाज प्रबोधनाचा प्रयत्न करत आहेत. पण लोक आमिर खानने सांगितलं तरच ऐकतायत” असं तसलीमा यांनी म्हटलं.

 

आता या स्त्रीवादी लेखिकेने सलमान खान, शाहरुख खान या सारख्या जबरदस्त फॅन फॉलोइंग असणाऱ्या सुपरस्टार्सनाही सल्ले दिले आहेत. त्यांनी लिहीलंय, “प्रिय सलमान, कृपया उद्या बलात्कार, घरातील हिंसाचार, हुंडाबळी या विषयांवर बोल. प्रिय शाहरूख, तू कृपया लैंगिक अत्याचाराबद्दल टीव्हीवर बोल. लोकांना या गोष्टींबद्दल माहिती असली पाहिजे. आम्ही हे विषय मांडतो. पण, आम्ही फिल्मस्टार्स नाही ना! ”

 

मात्र, नसरीन यांनी आमिरच्य़ा धाडसाचं कौतुकही केलं आहे.”लोकांना जागं करण्याची हिंमत केल्याबद्दल आमिर खानला सलाम.” मात्र, यापुढे त्या असंही म्हणाल्या, “मी ही फिल्म स्टार असते, तर किती बरं झालं असतं!”

 

माझ्या आगामी पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी मी ही पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एखाद्या फिल्मस्टारचाच सुंदर चेहरा वापरायचा म्हणते. असं नसरीन यांनी लिहीलं आहे. काहीही असे, पण, आमीर खानच्या सहभागामुळे जनजागृती होत आहे, हे मात्र खरं.