भगतसिंग सेनेचं 'कलर्स'वर अग्नि(वेश)कांड

बिग बॉसमधल्या स्वामी अग्निवेश यांच्या सहभागावरून भगत सिंग सेनेने बिग बॉस च्या निर्मात्यांना धमकी देणारं जाहीर पत्रच लिहीलं आहे. स्वामी अग्निवेश हे राष्ट्रद्रोही असल्यामुळे त्यांना या शोमध्ये घेऊ नका अशी सूचनावजा धमकीच दिली आहे.

Updated: Nov 8, 2011, 11:59 AM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

 

बिग बॉसमधल्या स्वामी अग्निवेश यांच्या सहभागावरून भगत सिंग सेनेने बिग बॉस च्या निर्मात्यांना धमकी देणारं जाहीर पत्रच लिहीलं आहे.  भगतसिंग सेनेचे अध्यक्ष ताजिंदर पाल सिंग बग्गा यांनी पत्रात स्वामी अग्निवेश हे राष्ट्रद्रोही असल्याचमुळे त्यांना या शोमध्ये घेऊ नका अशी सूचनावजा धमकीच दिली आहे.

 

टीम अण्‍णातून बाहेर पडलेले स्‍वामी अग्निवेश हे मंगळवारी ‘बिग बॉस’च्‍या घरात दाखल होत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर अग्निवेश यांनी टीका केली होती.
बिग बॉसच्‍या आयोजकांची खरंतर बाबा रामदेव यांनाच आणण्‍याची इच्छा होती. पण, त्यांचा नकार मिळाल्यावर स्‍वामी अग्निवेश यांना विचारणा केली गेली. त्‍यांनी बिग बॉसच्‍या प्रस्‍तावाला होकार दिला. स्‍वामी अग्निवेश अण्‍णा हजारे यांच्‍या आंदोलनापुर्वीपासूनच चर्चेत आहेत. नक्षलवाद्यांना समर्थनाची भुमिका घेतल्‍यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. तर आता अण्‍णा हजारे यांच्‍याविरोधात त्‍यांनी वक्तव्‍ये केल्‍यामुळे ते आणखी चर्चेत आले आहेत. त्‍यामुळे अग्निवेश यांच्‍या प्रवेशानंतर या वाहिनीला टीआरपीमध्‍ये मोठी वाढ होण्‍याची अपेक्षा आहे.

 

टीम अण्‍णामधुन ते बाहेर पडल्यानंतर त्‍यांनी उघडपणे अण्‍णा हजारे आणि त्‍यांच्‍या जवळच्‍या सहकाऱ्यांविरोधात बोलायला सुरुवात केली होती. टीम अण्‍णांचे भेद काँग्रेसकडे उघड केल्‍याचे आरोप झाल्‍यामुळे ते बाहेर पडले होते. त्‍यामुळे अग्निवेश हे टीम अण्‍णांच्या विरोधात बिग बॉसच्‍या घरात तोंड उघडतील, अशी चर्चा आहे