www.24taas.com, कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंदिरा भवनचं नाव बदलण्याचा जो प्रस्ताव मांडला आहे, त्यावरून आता काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नावावरून कोलकात्त्यातील गेस्ट हाऊसला इंदिरा भवन नाव देण्यात आले होते. मात्र तृणमूल काँग्रेसने हे नाव बदलून प्रसिद्ध बंगाली कवी नजरूल इस्लाम यांच्या नावावरून नजरुल भवन करण्यात यावं असा प्रस्ताव मांडला. मात्र, याला काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. कोलकात्त्यामध्ये युवा काँग्रेसच्या लोकांनी याविरुद्ध शहरभर निदर्शनही केलं.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मात्र काँग्रेसवर निशाणा साधत म्हटलं की मी कधीही सोनिया गांधींबद्दल वाईट बोलले नाही. या सगळ्यालाच मीडियाच जबाबदार आहे. याशिवाय बॅनर्जींनी काँग्रेस डाव्या पक्षांशी मिळालं असल्याचा आरोपही केला आहे. एफडीआय आणि लोकपालवर तृणमूलने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे काँग्रेस आमच्याविरुद्ध राजकारण करत आहे.
मात्र, तृणमूल काँग्रेसमरोबर आमचे कुठलेही मतभेद नसल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केलं आहे. प. बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसची युती आहे. काँग्रेसने नेहमीच कवी, संगीतकारांचा सन्मान केला आहे. मात्र, ममता बॅनर्जींनी हे विसरू नये की त्यांनीही इंदिरा गांधींच्या हाताखाली काम केलं आहे, असं तिवारी म्हणाले.
गेल्या वर्षी लोकपाल, पेट्रोल भाववाढ आणि एफडीआयवरून तृणमूल काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे काँग्रेसचे धाबे दणाणले होते. आता इमारतीच्या नावाचा मुद्दा पुढे करून ममता बॅनर्जींनी पुन्हा काँग्रेसला झटका दिला आहे.