एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशनमधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे. ख्रिसमसला या हवाईसुंदरींसाठी तो जणू सांताक्लॉजच्या रुपात अवतरला आहे असंच म्हणावं लागेल.
आर्थिक आरिष्टात सापडेल्या एअर इंडिया आणि मल्ल्यांच्या किंगफिशरमध्ये आजकाल पगार वेळेवर होत नाही. त्यातच सरकारी एअर इंडियात किंग फिशरच्या तुलनेत पगार तसा खुपच कमी मिळतो पण सरकारी नोकरीची सुरक्षितता महत्वाची असते हे आता किंगफिशच्या हवाईसुंदरींना अनुभवानंतर आलेलं शहाणपण बरचं काही सांगून जातं. या आधी किंगफिशरच्या १४० वैमानिकांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात कंपनीला अखेरचा राम राम ठोकला होता.
आता किंगफिशरला वैमानिकांच्या अभावी वेळेवर उडाण आणि सेवा देण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. हे कमी की काय आता वैमानिकांच्या पाठोपाठ हवाईसुंदरीही सोडून गेल्यामुळे किंगफिशरच्या अडचणीत भरच पडली आहे. किंगफिशने खर्चात कपात करण्यासाठी काही शहरांमध्ये कर्मचाऱ्यांचे तळ (क्रू बेस) बंद करायला सुरवात केली आहे. एअर इंडिया आणि किंगफिशर दोन्ही विमान कंपन्यांमध्ये पगार वेळेवर होण्याबाबत मोठी अनिश्चितता आहे.