काँग्रेसचा पराभव स्थानिक नेत्यांमुळे - सोनिया

पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही. आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे.

Updated: Mar 7, 2012, 10:36 PM IST

www.24taas.com,  नवी दिल्ली

 

 

पाचपैकी चार राज्यांतील निवडणूक निकालांमध्ये काँग्रेस पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर  काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी बोलल्या, आम्हाला धोका नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर (यूपीए) याचा कोणताही परिणाम होणार नाही.  आम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणात जनतेचा पाठिंबा मिळालेला नाही. आम्ही पराभव स्वीकारला आहे. हा पराभव स्थानिक नेत्यांमुळे झाल्याचं सांगून त्यांच्यावरच सोनियांनी खापर फोडलं आहे.

 

 

प्रत्येक निवडणूक विजय किंवा पराजयापुरती मर्यादित नसते. या निवडणुकांतून आम्हाला  धडा मिळाला आहे. चुकीच्या उमेदवारांची निवड केल्याने पराभव पदरी आला.   उत्तर प्रदेशात काँग्रेस नेतृत्त्वाचा जनसंपर्क कमी दिसून आला आहे. याचे आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत.  विकासाची कोणतीही योजना नसल्यामुळे राज्यातील नागरिकांनी   बहुजन समाज पक्षाला सत्तेवरून खाली खेचून, समाजवादी पक्षाला सत्तेवर बसविले.  मतदारांनी आमच्या पक्षाला नाकारले असले तरी रायबरेली आणि अमेठीतील निवडणुकांमध्ये काँग्रेसने अनेक वेळा पराभव पाहिलेला आहे. त्यामुळे तेथील नेतृत्त्वात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे सोनिया गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी कायम ठेवण्यात येणार आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा संभाव्य पंतप्रधान कोण असेल, याचा उच्चार करण्याचे सोनिया गांधी यांनी टाळले. आगामी काळात गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार असल्याने, आताच्या पराभवातून बोध घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.