काय झालं काँग्रेस-राष्ट्रवादीत डील?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय.

Updated: Jul 26, 2012, 07:54 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाराजी अखेर दूर झालीय. पंतप्रधान, सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीतला तिढा अखेर सुटला. ‘यूपीए’मध्ये अधिक समन्वय असावा, ही पवारांची मागणी या बैठकीत मान्य करण्यात आलीय. यापुढे यूपीए आणि राज्य सरकारच्या समन्वय समितीच्या बैठका दर महिन्याला होणार आहेत. तसचं मोठ्या निर्णयावेळीही यूपीएतल्या घटक पक्षांना विश्वासात घेण्यात येईल, असं आश्वासन काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती आहे. या भेटीनंतर तिढा सुटला असून, राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा कामकाजाला सुरुवात करणार आहेत. बुधवारी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या राजीनामा नाट्यावर अखेर पडदा पडल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलं.

 

 

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांचं गाऱ्हाणं कुणी ऐको किंवा न ऐको देशाचे कृषीमंत्र्यांचं मात्र ऐकतील, हे नक्की. कारण सरकारी कामकाजावर त्यांनी टाकलेला बहिष्कार आता मागं घेतलाय. काँग्रेसनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. पंतप्रधान, सोनिया गांधी आणि पवार यांच्यात झालेल्या बैठकीत पवारांची नाराजी दूर झाली. पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद संपल्याचं सागितलं. काँग्रेसनंही आता सर्वकाही आलबेल असल्याचं म्हटलंय.

 

समन्वय समिती संदर्भातला वाद मिटल्याचं दोन्ही काँग्रेसचे नेते सांगत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. राज्यातला सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्यावर पांघरुन घालण्यास मदत केली जाणार असल्याची चर्चा आहे. तसंच लवासा प्रकल्पाच्या अडचणीही लवकरच दूर होण्याची शक्यता आहे. नाराजी दूर झाल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून मंत्रालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेले राष्ट्रवादीचे मंत्री पुन्हा कामाला सुरूवात करणार आहेत.

 

राज्यातही संपला राष्ट्रवादीचा वाद 

केंद्रात शरद पवारांची यूपीए सरकारवरची नाराजी दूर झाल्यानंतर राज्यातही राष्ट्रवादी काँग्रेसची नाराजी दूर झालीय. दिल्लीतला पेच सुचल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. येत्या २ किंवा ३ तारखेला राज्यातही समन्वय समितीची बैठक होणार आहे.

 

.