www.24taas.com, कानपूर
आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचं सोमवारी कानपूरमध्ये निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
लक्ष्मी सेहगल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापित केलेल्या आझाद हिंद सेनेतील ‘राणी झाशी रेजिमेंट’चं कॅप्टनपद मोठ्या धाडसानं सांभाळलं होतं. लक्ष्मी सेहगल यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यामुळे गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची काळजी घेण्यासाठी खास वैद्यकीय पथकही नेमण्यात आलं होतं, मात्र वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीरानं औषधोपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि अखेर सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूनंतरही त्यांनी समाजसेवेचं व्रत कायम राखत देहदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांनी कानपूर मेडिकल कॉलेजकडे त्यांचं पार्थिव सुपूर्द केलं. सेहगल यांच्यामागे मुलगी माकप नेत्या सुभाषिनी अली, जावई मुझफ्फर अली, नातू शाद अली असा परिवार आहे.
२४ ऑक्टोबर १९१४ रोजी चेन्नई इथं लक्ष्मी सेहगल यांचा जन्म झाला होता. सेहगल यांचे वडील डॉ. एस. स्वामीनाथन हे प्रख्यात वकील होते, तर आई अमू स्वामीनाथन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. १९३८ साली त्यांनी ‘एमबीबीएस’ची पदवी घेतली. डॉक्टरकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४० मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपर्कात त्या आल्या. दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये जखमी सैनिकांवर त्यांनी औषधोपचार केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महिलांसाठी ‘राणी झाशी रेजिमेंट’ची स्थापना केली. लक्ष्मी सेहगल यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. सेहगल यांनी कर्नलपदापर्यंत बढती मिळविली पण त्यांची ‘कॅप्टन’ ही ओळख अखेरपर्यंत कायम राहिली.
‘बीग बी’ झाले हळवे
लक्ष्मी सेहगल यांच्या निधनानं 'बीग बी' अमिताभ बच्चनही हळवे झालेत. भारतानं एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि एक साहसी महिला गमावल्याचं बीग बी यांनी म्हटलंय. ‘बंटी और बबली’ आणि ‘झूम बराबर झूम’चा निर्देशक शाद अली हा लक्ष्मी सेहगल यांचा नातू... सेहगल यांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच शादनं बीग बी यांना एसएमएस करून आपल्या आजीच्या आजाराची माहिती दिली होती. पण, ह्रद्यविकाराचा तीव्र झटका येऊनही त्यांची झुंज देण्याची क्षमता संपली नाहीय, असंही त्यानं यावेळी अमिताभ बच्चन यांना कळवलं होतं.