'पुढचा पंतप्रधान काँग्रेस-भाजपचा नाही' - अडवाणी

लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य असल्याचं भाकित वर्तवलंय खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी... राजकारणात अनेक वर्ष घालवलेल्या अनुभवी अडवाणींनी आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतलाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असंही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

Updated: Aug 5, 2012, 07:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये काँग्रेस आणि भाजपला बहुमत मिळणं अशक्य असल्याचं भाकित वर्तवलंय खुद्द भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी... राजकारणात अनेक वर्ष घालवलेल्या अनुभवी अडवाणींनी आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉगचा आधार घेतलाय. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपचा पंतप्रधान होणार नाही, असंही अडवाणींनी या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

'२०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १०० हून अधिक जागा मिळणे अवघड आहे तर भाजपही बहुमताच्या जादूई आकड्याला स्पर्श करु शकणार नाही.  त्यामुळे काँग्रेस आणि भाजप त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पंतप्रधान करण्यापेक्षा सहकारी पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान करण्याची शक्यता अधिक आहे. तिसरी आघाडीही सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असणार नाही’ असं अडवाणींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

अडवाणींनी ब्लॉगमध्ये दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिलेल्या भोजनाचा उल्लेख केला आहे. त्यावेळी दोन केंद्रीय मंत्र्यांशी झालेल्या अनौपचारीक चर्चेत या मंत्र्यांनी आपली शंका आपल्याजवळ व्यक्त केल्याचंही त्यांनी म्हटलंय.'या मंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून त्यांची त्यांची चिंता स्पष्ट होते. त्यांना शंका आहे की, आगामी लोकसभा निवडणूकीत काँग्रेस आणि भाजप प्रणित आघाडीकडे एवढे बहुमत नक्कीच नसणार की ते सरकार स्थापन करु शकतील.  त्यांना वाटतंय, २०१३ किंवा २०१४ मध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तिसरी आघाडी सत्तेत येईल. काँग्रेस मंत्र्यांना वाटते की, हे भारतीय राजकारण आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने चांगले नाही'.

अर्थातच काँग्रेसनं अडवाणींचा हा ब्लॉग म्हणजे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची परिणीती असल्याची टीका केलीय. अडवाणींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी भाजपची चिंता करण्याचा सल्लाही यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिलीय.

.