बनावट नोटा सांगणार संकेतस्थळ

Updated: Jul 8, 2012, 09:30 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

देशातील चलनात बनावट नोटा आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा काहींचा प्रयत्न असतो. तर जास्त पैसे कमविण्याच्या नावाखाली अनेक वेळा बनावट नोटा छपाईंचे उद्योग सुरू असतात. तसेच चलनातील बनावट नोटांना चाप बसविण्यासाठी संकेतस्थळाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे. बनावट नोटांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नवी वेबसाईट सुरु केली आहे.

 

आरबीआयच्या मुख्य वेबसाईटवरही या वेबसाईटची लिंक उपलब्ध आहे. www.paisaboltahai.rbi.org.in  ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा खऱ्या ओळखण्यासाठी पॉईंटर्स स्वरुपात सादरीकरण करण्यात आले आहे. तसेच ग्राहकांना या खऱ्या नोटा ओळखण्याची प्रणाली डाऊनलोड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. एक डॉक्युमेंटरी फिल्मही डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

 

आरबीआयने सुरु केलेल्या या वेबसाईटवर बनावट नोटा कशा ओळखायच्या याचे सविस्तर वर्णन केले आहे. या वेबसाईटला 'पेहचानो पैसे की बोली, क्योंकी पैसा बोलता है' अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.  त्यामुळे आता सहज बनावट नोटा ओळखण्यास मदत होईल.