यशकर सिन्हांच्या मृत्यूचे गुढ वाढलं

संरक्षण मंत्रालयात अधिकारीपदावर असलेल्या कुमार यशकर सिन्हा आणि त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांच्या गुढ मृत्यूला दोन दिवस झाले असले तरी त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या हाताला कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. यशकर सिन्हांनी आपल्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल आपला भाऊ पुष्कर सिन्हांना सांगितलं होतं. ते आपल्या भावाला भेटायला एका आठवड्यापूर्वी गेले होते.

Updated: Apr 2, 2012, 09:30 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
संरक्षण मंत्रालयात अधिकारीपदावर असलेल्या कुमार यशकर सिन्हा आणि त्यांच्या पत्नी अर्चना शर्मा यांच्या गुढ मृत्यूला दोन दिवस झाले असले तरी त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या हाताला कोणतेही धागेदोरे लागलेले नाहीत. यशकर सिन्हांनी आपल्यावर असलेल्या कामाच्या प्रचंड ताणाबद्दल आपला भाऊ पुष्कर सिन्हांना सांगितलं होतं. ते आपल्या भावाला भेटायला एका आठवड्यापूर्वी गेले होते.

यशकर सिन्हा यांनी मृत्यूपूर्वी एक दिवस आधी आपल्या बहिणीची भेट घेतली होती. दिल्ली पोलिसांना सिन्हांच्या घरातून एक हिरव्या रंगाच्या लिफाफ्यात हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे त्यात कामाच्या ताणासदर्भात त्यांनी दोन लष्करी अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन संशयित अधिकाऱ्यांना आता उलटतपासणीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. यशकर आणि त्यांच्या पत्नी हे आनंद जोडपं होतं असं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. यशकर आणि त्यांच्या पत्नीच्या नातेवाईकांनी मृत्यूमागे षडयंत्र असण्याचा आरोप केला आहे. यशकर सिन्हांच्या सहकाऱ्यांची चौकशी आता दिल्ली पोलिस करत आहेत.

कुमार यशकर सिन्हा डायरेक्टोरेट जनरल ऑफ मेडिकल सर्व्हिसेसमध्ये डेप्युटी डायरेक्टरपदावर कार्यरत होते. ते त्यांच्या पत्नीसह दक्षिण दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गुढरित्या मृत अवस्थेत सापडले होते. सुरवातीच्या रिपोर्टवरुन यशकर यांनी आधी आपल्या पत्नीचा गळा आवळला आणि नंतर स्वताला जाळून घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण आता त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन यामागे काहीतरी कारस्थान असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.