www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर करण्यासाठी जसजसा वेळ जातोय तसतसं युपीए सरकार आपला एक एक पत्ता हळूहळू उघडण्याच्या प्रयत्नात आहे. आत्तापर्यंत राष्ट्रपतीपदासाठी युपीएकडून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे केलं जाणार हे तर स्पष्ट झालंय. मग, भाजपकडून काहीच हालचाल होणार नाही, हे कसं शक्य आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी झालेत.
युपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावावर बरीच चर्चा झाल्यानंतर आता त्यांच्या नावाला सगळीकडूनच हिरवा कंदील मिळत असल्याची चिन्ह आहे. १५ जून रोजी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. याचसाठी प्रणव मुखर्जी यांनी १४ जून रोजी आयोजित केलेली काबूल यात्राही रद्द केलीय, अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय. सोनिया गांधी याच राष्ट्रपतीपदासाठी उमेद्वार निवडणार आहेत आणि त्याच या नावाची घोषणाही करतील.
तर दुसरीकडे, भाजपचे वरिष्ठ नेते जसवंत सिंह उपराष्ट्रपती पदाचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांची भेटदेखील घेतली आहे. भाजपकडून मात्र अजून जसवंत सिंह यांचं नाव पुढे केलं गेलेलं नसलं तरी जसवंत सिंह यांच्या हालचालींवरून तेही या शर्यतीत सहभागी होणार हे स्पष्ट झालंय. मुलायम सिंह यांची भेट घेतल्यानंतर जसवंत सिंह इतर पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार आहेत.
.